

तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अडीच महिने आधीच पहिल्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऐन परीक्षेवेळी ठरविलेल्या वेळापत्रकात विद्यापीठाला अनेकदा बदल करावे लागले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी वेळ मिळावा, परीक्षा नेमकी कधी होणार हे कळावे, म्हणून पहिल्यांदाच विद्यापीठाने हा प्रयोग केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ११ संकुले, संलग्नित ११५ उच्च महाविद्यालयांमधील एकूण ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची पहिली सत्र परीक्षा २९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून दिवाळीपूर्वी ती संपणार आहे. तीन सत्रांत परीक्षा घेतली जाणार असल्याने प्रत्येक अभ्यासक्रमाची परीक्षा १२ ते १४ दिवसांत संपविली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरनंतर अभ्यासासाठी एक-दोन दिवसांची सुट्टीही असणार आहे. परीक्षेनंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत निकाल जाहीर होतील, अशी यंत्रणा विद्यापीठाने उभारली आहे. त्यासाठी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व विषयांच्या प्राध्यापकांची मदत घेण्यात आली आहे. गतवर्षी ४०७ पैकी ३५४ अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांत जाहीर झाले होते. विद्यापीठाने त्याचे श्रेय सर्व प्राध्यापक व प्राचार्यांना दिले आहे.
दिवाळीपूर्वी संपतील परीक्षा
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काही दिवस आधी वेळापत्रक जाहीर केल्यावर अभ्यासाचे नियोजन करता येत नाही. वेळापत्रकात अनेकदा बदल होतात, त्यामुळे निकाल विलंबाने जाहीर होतात. या पार्श्वभूमीवर आपण आता अडीच महिने आधी सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाची परीक्षा १४ दिवसांत संपेल, असे नियोजन आहे. दिवाळीपूर्वी परीक्षा संपणार आहेत.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर
परीक्षेचे वेळापत्रक असे...
पदवी अभ्यासक्रम : २९ सप्टेंबरपासून
पदव्युत्तर अभ्यासक्रम : ८ ऑक्टोबरपासून
अभियांत्रिकीची परीक्षा : १५ ऑक्टोबरपासून
किती सत्रांत परीक्षा : ३ (सकाळ, दुपार, सायंकाळ)
वर्गांत सीसीटीव्ही आणि ७५ टक्के हजेरीचे बंधन
विद्यापीठाशी संलग्नित सर्व उच्च महाविद्यालयांमधील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन घालण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीदेखील बंधनकारक करण्यात आली आहे. परीक्षेस बसण्यासाठी ७५ टक्के हजेरी आवश्यक असणार आहे. परीक्षेवेळी विद्यापीठात मोठा स्क्रीन बसविला जाणार आहे. परीक्षा केंद्रावरील प्रत्येक हालचालीवर विद्यापीठातून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.