ठरलं! सोलापूर ‘झेडपी’त राष्ट्रवादीचाच अध्यक्ष!

अशोक मुरूमकर
Saturday, 21 December 2019

पवार यांनी सांगितल्यानुसार, येथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त म्हणजे २३ जागा असल्याने काँग्रेस व शिवसेनेच्या मदतीने त्यांचा अध्यक्ष होऊ शकणार आहे. तर महाविकास आघाडीतील दोन नंबरच्या म्हणजे सात जागा असणाऱ्या काँग्रेसचा उपाध्यक्ष व तीन नंबरची सदस्यसंख्या म्हणजे पाच सदस्य असलेल्या शिवसेनेला विविध विभागांचे सभापती पद मिळू शकणार आहे.

सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवलेल्या भाजपला राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून विरोधी बाकावर बसवले. आता तोच प्रयोग होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत वापरला जाणार आहे. ‘याबाबत चर्चा झाली असून, ज्या जिल्हा परिषदेत ज्या पक्षाचे जास्त सदस्य त्यांचा अध्यक्ष; दोन नंबरची संख्या असणाऱ्या पक्षाचा उपाध्यक्ष व तीन नंबरची सदस्यसंख्या असलेल्या पक्षाचा सभापती करा', असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेस व शिवसेनेला दिला आहे. हे सूत्र सर्वांना मान्य आहे, असं दिसत आहे. पण 'जिल्ह्या-जिल्ह्याची परिस्थिती बघितल्याशिवाय सांगता येणार नाही,’ असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : संजय राऊत म्हणालेत ‘ते’ तर आमचेच मुख्यमंत्री..

कोण होणार अध्यक्ष, याकडे लक्ष
औरंगाबाद येथे शुक्रवारी श्री. पवार यांनी एका दैनिकाच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. येथील अध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपत आलेला आहे.  त्यामुळे झेडपीचा अध्यक्ष कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ६८ सदस्य आहेत. त्यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यात राष्ट्रवादीला २३ व काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या. सर्वात जास्त जागा असतानाही अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला नव्हता. त्यात अपक्ष निवडून आलेले सदस्य संजय शिंदे यांनी यशस्वी खेळी करून अध्यक्षपद पदरी पाडले.  त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. पुढे अपक्ष म्हणून ते करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरले, त्यात ते विजयी झाले. 

हेही वाचा : राणे भडकले, मुख्यमंत्री सोनिया गांधींना कोणती ओळख सांगणार (व्हिडिओ)
राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा

शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर अध्यक्षपदाचा कार्यकालही संपत आला असून अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. श्री. पवार यांनी सांगितल्यानुसार, येथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त म्हणजे २३ जागा असल्याने काँग्रेस व शिवसेनेच्या मदतीने त्यांचा अध्यक्ष होऊ शकणार आहे. तर महाविकास आघाडीतील दोन नंबरच्या म्हणजे सात जागा असणाऱ्या काँग्रेसचा उपाध्यक्ष व तीन नंबरची सदस्यसंख्या म्हणजे पाच सदस्य असलेल्या शिवसेनेला विविध विभागांचे सभापती पद मिळू शकणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व बबनराव शिंदे यांच्यात वर्चस्वासाठी नेहमीच संघर्ष राहिला आहे. झेडपीच्या निवडणुकीवेळी हे दोघेही राष्ट्रवादीकडूनच होते. मात्र लोकसभा निवडणुकीपासून मोहिते-पाटील यांनी भाजपशी जवळीक वाढवली आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी तर भाजपमध्ये प्रवेशच केलेला आहे. मात्र, विजयसिंह मोहिते- पाटीलही तेव्हापासूनच भाजपच्या वाटेवर आहेत. फक्त त्यांनी अधिकृत प्रवेश केलेला नाही.

हेही वाचा : सिंचन गैरव्यवहारातून अजित पवार यांची सुटका; काय घडले?

काँग्रेसच्या सात, शिवसेनेच्या पाच जागा
माळशिरस तालुक्यातील ११ पैकी आठ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र, त्यातील बहुतांश सदस्य मोहिते-पाटील यांना मानणारे आहेत. करमाळा तालुक्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचपैकी चार जागा शिवसेनेला मिळाल्या. मात्र, येथेही मोहिते-पाटील समर्थक जास्त आहेत.  राष्ट्रवादीला येथे एक जागा मिळाली होती. माढ्यात बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सात जागा मिळवल्या होत्या. सांगोला तालुक्यात शेकापचे गणपतराव देशमुख व दीपक साळुंखे यांनी सातपैकी पाच जागा जिंकत शिवसेनेला रोखले होते. पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी पैकी सात जागा परिचारक गटाने जिंकल्या. येथे काँग्रेसला एकही जागा नाही. अक्कलकोटमध्ये सहापैकी काँग्रेसने तीन जागा मिळवल्या. मंगळवेढा तालुक्यात शिवसेना पुरस्कृत समाधान अवताडे गटाला चारपैकी तीन जागा मिळाल्या होत्या. सर्वात जास्त जागा असूनही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवला नाही. दरम्यान, आमदार संजय शिंदे यांनी अध्यक्ष होण्यासाठी यशस्वी खेळी खेळत ४४ सदस्यांची गोवा सहल घडवून आणली होती.
-

पक्षीय बलाबल

  • राष्ट्रवादी : २३

  • भाजप : १४
  • काँग्रेस : ७
  • शिवसेना : ५
  • स्थानिक आघाड्या : १६
  • अपक्ष : ३

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur zp will be the president of NCP