
उजनी ७७ टक्क्यांवर! ‘उजनी’तून होणार दररोज २.८० लाख युनिट वीजनिर्मिती
सोलापूर - उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा १०५ टीएमसी झाला असून, धरणाने ७७ टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. अजूनही दौंडमधून नऊ हजार क्युसेक विसर्गाने पाणी धरणात येत आहे. ४ ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज असल्याने धरण ९० टक्क्यांवर गेल्यानंतर नदीतून पाणी सोडले जाईल. त्यावेळी धरणावरील वीज प्रकल्पातून दररोज दोन लाख ८० हजार युनिट वीज तयार केली जाणार आहे.
सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यातील उद्योगांसह नागरिकांची, शेतीची तहान भागविण्यात उजनी धरणाचा सर्वाधिक वाटा आहे. उस्मानाबाद शहरालाही उजनीतून पाणीपुरवठा केला जातो. सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या भरोशावर उसाचे क्षेत्र वाढले आणि सर्वाधिक ४० पेक्षा जास्त कारखाने उभारले. रब्बीच्या जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढले, ते उजनीमुळेच. ८ जुलैला धरणातील मृतसाठा देखील ६.८४ टीएमसीपर्यंत मायनस गेला होता. पण, त्यानंतर सोलापूरसह पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाणी येऊ लागले. आता मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तरीपण, धरणात दररोज सरासरी एक टीएमसी पाणी जमा होत आहे. धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवर गेल्याने सध्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून १४८ क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून (बोगदा) दोनशे क्युसेकने सीना नदीत पाणी सोडले आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत कॅनॉलची दुरुस्ती सुरु असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यातही पाणी सोडण्यात येणार आहे.
दररोज १२ मेगावॅट वीजनिर्मिती...
उजनी धरणाने ९० टक्क्यांची पातळी ओलांडल्यानंतर पावसाचे पडणारे पाणी आणि धरणात येणारा विसर्ग, याचा अंदाज घेऊन वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. नदीतून पाणी सोडताना वीज निर्मिती सुरु होईल. २४ तासांत १२ मेगावॅट वीज तयार करणारा हा प्रकल्प आहे. दररोज जवळपास दोन लाख ८० हजार युनिट वीजेची निर्मिती त्यातून होते. सध्या धरणात ४१ टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे.
Web Title: 105 Tmc Water Storage In Ujani Dam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..