
सोलापूर : जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडील पंचनामे अहवालानुसार आतापर्यंत १५ लाख ४३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने नुकसानग्रस्तांची मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा लाभ केवळ जिरायती शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. अतिवृष्टीच्या भरपाईपोटी राज्य सरकारला तब्बल २० हजार ४०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
जून महिन्यात दडी मारलेला पाऊस विदर्भ, मराठवड्यात मुसळधार कोसळत आहे. हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या दहा जिल्ह्यातील जवळपास ११ लाख हेक्टरवरील शेती पिके पाण्याखाली आहेत. त्यात जिरायती व बागायती जमिनीवरील पिके मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, या अतिवृष्टीत फळबागांच्या तुलनेत जिरायती व बागायती क्षेत्रावरील सोयाबिन, मका, कापूस, उडीद अशा पिकांचेच सर्वाधिक नुकसान झाले आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जिरायती शेती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांऐवजी दहा हजार रुपयांची मदत दिली होती. तर अन्य पिकांच्या भरपाईदेखील वाढ केली होती. पण, शिंदे-फडणवीस सरकारने जिरायती शेतकऱ्यांच्याच भरपाईत दुप्पट वाढ केली असून दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत हा लाभ देण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल असल्याचेही बोलले जात आहे. आतापर्यंत ठाणे, लातूर, अमरावती वगळता २३ जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल कृषी विभागाला मिळाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे त्यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्या यादीत सोलापूरचा समावेश नाही.
निर्णयाचा लाभ विदर्भ-मराठवाड्यालाच
पूर्वीच्या शासन निर्णयानुसार जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्यास प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत राज्य सरकारकडून ‘एसडीआरएफ’मधून दिली जात होती. पण, आता ही रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान विदर्भ-मराठवाड्यात झाले असून त्यात जिरायती क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक लाभ त्या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.
सर्वाधिक नुकसान झालेले दहा जिल्हे
जिल्हा बाधित क्षेत्र (हेक्टर)
नांदेड ३,५८,७३१
यवतमाळ ३,०१,७०७
अमराती १,९१,१८४
वर्धा १,७३,४३७
चंद्रपूर १,५९,४०८
नागपूर १,१४,९३७
हिंगोली ८०,०३७
अकोला ७६,०२३
गडचिरोली २५,९७५
भंडारा ११,७८६