
पंढरपूर : भीमा आणि नीरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २६) सकाळी चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला तर चंद्रभागेच्या पात्रातील भक्त पुंडलिकासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. सायंकाळी चार वाजता चंद्रभागा नदी सुमारे ४५ हजार क्युसेकने प्रवाहित झाली होती. भीमा व नीरा या दोन नद्यांवरील पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.