सोलापुरातील ‘ही’ २४२ गावे पितात दूषित पाणी! झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाला नाही वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

contaminated water
सोलापुरातील ‘ही’ २४२ गावे पितात दूषित पाणी! झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाला नाही वेळ

सोलापुरातील ‘ही’ २४२ गावे पितात दूषित पाणी! झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाला नाही वेळ

सोलापूर : ‘स्वच्छ, सुंदर शहर आणि स्वच्छ व सुंदर गावा’चा डांगोरा पिटणाऱ्या प्रशासनाला गावोगावच्या दूषित पाण्यासंदर्भात लक्ष द्यायला वेळ नाही, हे विशेष. जिल्ह्यातील २४२ गावे दूषित पाणी पितात, ही बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात पाण्यात टीडीएस, लोह, पीएच, क्लोराईड, सल्फेट व हार्डनेस असल्याची बाब भूजल विभागाने केलेल्या पाणी नमुना तपासणीतून उघड झाली आहे.

भूजल विभागाने जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील प्रत्येक गावातून पाण्याचे एकूण नऊ हजार ६८३ नमुने तपासणीसाठी संकलित केले. ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ अधिक, अशा ठिकाणचेच ते नमुने होते. ९०८ ठिकाणच्या पाणी नमुन्याने अनेकांची झोप उडवली. पाण्याचा टीडीएस दोन हजारांहून, एक मिलिग्रॅमपेक्षा अधिक लोहाचे प्रमाण, साडेआठपेक्षा अधिक पीएच, अल्कालिनिटी सहाशेहून अधिक, क्लोराईड व सल्फेट चारशे ते एक हजारांहून अधिक आणि पाण्यातील जडत्व (हार्डनेस) सहाशेपेक्षा जास्त निघाले. वास्तविक पाहता नागरिकांच्या आजाराचे मूळ कारण दूषित पाणी हेच आहे. वाढलेले औद्योगीकरण, गावातील तुंबलेल्या गटारी तथा बंदिस्त गटारीची सोय नाही, पाण्याच्या स्रोताजवळच सांडपाणी साचणे, शेतीसाठी रासायनिक खतांचा भडिमार या प्रमुख कारणांमुळे त्या २४२ गावांमधील पाणी काही दिवसांत स्वच्छ होणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा गंभीर स्थितीतही त्या गावांतील गावकरी दूषित पाणी पिऊन आरोग्य धोक्यात घालत आहेत. त्याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे.

२४२ गावांमधील पाण्याची स्थिती

  • पाण्यातील घटक योग्य प्रमाण सद्यःस्थिती

  • टीडीएस २०० २०००हून अधिक

  • लोह ०.५ १.० पेक्षा जास्त

  • क्लोराईड २५० १०००हून अधिक

  • सल्फेट २०० ४००पेक्षा जास्त

  • हार्डनेस ३०० ६००हून अधिक

शुध्द पाणी प्यावे

पाण्यातील घटक योग्य प्रमाणात असल्यास मानवी आरोग्य व्यवस्थित राहते. पाण्यात टीडीएस, हार्डनेस, क्लोराईड, फ्लोराईड, सल्फेट, पीएच व लोह अधिक प्रमाणात असणे शरीरासाठी घातक असते. सातत्याने तेच पाणी प्याल्यास पोटाचे, किडनी व हाडाचे विकार बळावतात.

- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर

पंढरपूरमध्ये दूषित पाण्याची सर्वाधिक गावे

पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक ५३ गावे दूषित पाणी पितात, ही गंभीर बाब समोर आली आहे. त्यात अनवली, अव्हे, बाभूळगाव, बार्डी, भंडीशेगाव, भातंबरे, बिटरगाव, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, चिंचोळी भोसे, देगाव, देवडे, एकलासपूर, फुलचिंचोली, गोपाळपूर, गुरसाळे, होळे, जाधववाडी, करकंब, कौठाळी, खेड भाळवणी, खेड भोसे, कोंढारकी, कोर्टी, मगरवाडी, मुंढेवाडी, नेमतवाडी, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, पेहे, पिराची कुरोली, पोहोरगाव, पुळूज, पुळूजवाडी, रांझणी, शंकरगाव, शेळवे, शिरढोण, सिद्धेवाडी, सुगाव खुर्द, सुस्ते, टाकळी गुरसाळी, टाकळी, तारापूर, तावशी, तुंगत, उजनी, उपरी, विटे व वाखरी या गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.

नागरिकांनी ‘हे’ करावेत तात्पुरते उपाय

  • पाणी गरम करून गाळून प्यावे

  • प्युरिफायर बसवून त्यातून पाणी शुद्ध करावे

  • पाण्याच्या स्रोतातून नियमित पाणी उपसा हवा

  • पाणी पिण्यापूर्वीच त्याची चव, वास, गढुळता पडताळून पाहा

Web Title: 242 Villages In Solapur Are Drinking Contaminated Water Zp Water Supply Department Has No

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..