
सोलापूर : तब्बल 26 वर्षांपेक्षा अधिक काळ चालू असलेला दिवाणी वाद राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपुष्टात आला. भाड्याने दिलेल्या जागेचा कब्जा मिळावा यासाठी 1994 मध्ये दाखल केलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आला, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शशिकांत मोकाशी यांनी दिली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या लोक अदालतीमध्ये 793 प्रलंबित प्रकरणांत तडजोड झाली. त्याचबरोबर 323 दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात येऊन 8 कोटी 93 लाख 95 हजार 399 रुपयांची तडजोड झाली, असेही श्री. मोकाशी यांनी सांगितले.
श्री. मोकाशी यांनी सांगितले, की सोलापुरातील भाड्याने दिलेल्या जागेबाबत 1994 मध्ये दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. तो दावा 1997 मध्ये मंजूर झाला. त्यावर वादीने 2000 मध्ये दरखास्त दाखल केली. दिवाणी न्यायाधीश एस. एस. पाटील यांच्या न्यायालयात प्रलंबित होती. त्यांनी हा दावा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पाठवून दिला होता. त्यावर पॅनेलप्रमुख न्या. श्रीमती एस. एम. कनकदंडे, ऍड. अमित आळंगे, श्रीमती ए. व्ही. कदम यांनी वादी व प्रतिवादींचे समुपदेशन करून दावा निकाली काढला. यातील वादीचे वय 70 वर्षे तर प्रतिवादीचे वय 82 वर्षे आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. आर. देशपांडे, महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. सलगर, जिल्हा सरकारी वकील पी. एम. राजपूत यांच्या उपस्थितीत झाले.
लोक अदालतीमध्ये जिल्ह्यात एकूण 29 पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. 7 हजार 181 प्रलंबित आणि 10 हजार 140 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 793 प्रलंबित प्रकरणांत तडजोड झाली. त्याचबरोबर 323 दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.
जिल्हा न्यायालयातील पॅनेलवर न्या. व्ही. एच. पाटवदकर, बी. डी. पंडित, प्रतीक कपाडिया, एम. आर. देवकते, एम. एम. बवरे, आर. ए. मिसाळ यांनी काम पाहिले. प्राधिकरणाचे अधीक्षक पल्लवी पैठणकर, ए. बी. शेख, बाजीराव जाधवर, आर. बी. धनुरे यांनी नियोजन केले.
तडजोडीसाठी व्हॉट्सऍप कॉलिंगचा वापर
लोक अदालतीत कामकाजासाठी व्हॉट्सऍप कॉलिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्यात आला. याचा लोक अदालतीत हजर न राहू शकणाऱ्या पक्षकारांना फायदा झाला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.