Akkalkot- Jeur-Barur Road : अक्कलकोट - जेऊरमार्गे बरूर रस्त्यासाठी २७० कोटी - सचिन कल्याणशेट्टी

आमदार कल्याणशेट्टी; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आणखी एक मागणी मार्गी
Akkalkot- Jeur-Barur Road
Akkalkot- Jeur-Barur RoadSAkal

अक्कलकोट : अक्कलकोट ते जेऊरमार्गे बरूर या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या ४५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २७० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

गेल्या ३० वर्षापासून तडवळ भागाच्यादृष्टीने आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उमरगा तसेच कर्नाटकामधील कलबुर्गी, बिदर आणि आळंद भाग यांना विजयपूरला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आणि कमी अंतराचा आणि आर्थिक बचतीचा महामार्ग म्हणून या रस्त्याचे काम मार्गी लागणे अतिशय महत्त्वाचे होते.

याचा विचार करून आमदार कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. देगावं एक्स्प्रेस कॅनॉलच्या ४०० कोटींच्या कामानंतर आता पुन्हा तब्बल २७० कोटी रुपयांचे हे काम मार्गी लावले आहे.

जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्कलकोटला आले असता सदर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता लगेच होताना दिसत आहे. या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्यास गेल्या ३० वर्षांपासूनची अक्कलकोट ते तडवळ भागातली जनतेची मागणी पूर्णत्वास जाऊन दळणवळणाची सुविधा प्रचंड प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.

सदर रस्ता शेतकरी बांधवांना दुग्ध व शेती उत्पादने तसेच कृषिपूरक उत्पादने बाजारपेठेत पाठविण्यासाठी मदतीचा ठरणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर तसेच तेलंगणाच्या हैदराबाद तसेच बिदर, कलबुर्गी या कर्नाटकाच्या भागाला जवळच्या अंतराने जोडणारा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांच्या माध्यमातून जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.

पुढील ३० वर्षात वाढणारी वाहतूक विचारात घेऊन रस्ता बनविण्यात येणार आहे. सध्याची वाहतूक वर्दळ ७ हजार आहे, तर ३० वर्षानंतर ती ७० हजार होईल, अशी कल्पना करून रस्ता करण्यात येणार आहे. तडवळ साखर कारखान्याजवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीचे अडथळा होऊ नये म्हणून तिथे रस्ता १० मीटरचा करण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लोकसभेच्या आचारसंहितेनंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे.

वेळ अन्‌ आर्थिक बचत

सध्या अक्कलकोट ते बरूर या मार्गावर अक्कलकोट ते जेऊर तसेच कोर्सेगाव ते बरूर हा ५.५० मीटर लांबीचा तर जेऊर ते कोर्सेगाव हा ३.७५ मीटर लांबीचा डांबरी पृष्ठभाग असलेला रस्ता आहे. तो आता नव्याने प्रस्तावित कामात सात मीटरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनणार असून प्रत्येक गावाजवळ गटार, पदपथ आणि पेव्हर ब्लॉक,

परिसर उजळून टाकणारे विजेचे पथदिवे या कामांचा समावेश केला गेला आहे. या रस्त्यामुळे अक्कलकोट-जेऊर या भागातील नागरिकांना विजयपूरला जाण्यासाठी सोलापूरला न जाता टाकळीमार्गे जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे वेळ इंधन आणि आर्थिक बचत देखील होणार आहे.

अक्कलकोट ते बरूर रस्त्याच्या कामात समाविष्ट बाबी

प्रत्येक लहानमोठ्या गावातील बसस्थानकजवळील चौक हे आता पदपथ, गटार, पेव्हर ब्लॉक आणि पथदिव्यांनी उजळणार, पाइप मोऱ्या (३८), लहान पूल (१), बॉक्स कल्व्हर्ट(५), मोठा पूल (१), कठीण मुरुमाच्या बाजू पट्ट्या, पायाची भिंत, रिटेनिंग वॉल, उतार संरक्षण उपाय, मेटल बीम क्रॅश बॅरियरचे बांधकाम करणे, रस्त्याच्या लांबीमधील युटिलिटी शिफ्टिंग करणे,

जोड रस्ते आणि क्रॉसिंग व वळण भागामध्ये मानकानुसार सुधारणा, १० मोठे व २३ लहान ठिकाणचे छोटे जंक्शन, संरक्षक भिंत, युटिलिटी सर्व्हिस ज्यात येणाऱ्या गावातील विजेचे खांब, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या व इतर युटिलिटी सर्व्हिस हलविण्याची तरतूद गोषवाऱ्यात अंतर्भूत केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com