esakal | सोलापूर : दुर्गम भागातील रुग्णांसाठी तयार केल्या 3 रुग्णवाहिका । ambulance
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गम भागातील रुग्णांसाठी तयार केल्या 3 रुग्णवाहिका

दुर्गम भागातील रुग्णांसाठी तयार केल्या 3 रुग्णवाहिका

sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी: दुर्गम भागातील रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने त्यांना ने आण करण्यासाठी मुळचे कुर्डुवाडीचे असलेले व सध्या पुणे येथील रहिवासी अॅटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत असलेल्या नितिन गणपती करंदीकर यांनी स्वतः तीन दुचाकी रुग्णवाहिका तयार करुन गडचिरोली भागातील रुग्णांच्या सेवेसाठी फाउंडेशनकडे सुपुर्द केल्या आहेत. सध्या ते अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतमालाची वाहतुक करणाऱ्या ट्रॉली तयार करत आहेत.

हेही वाचा: सफाई कामगाराची मुलगी बनली 'तहसीलदार'

नितिन करंदीकर हे मुळचे कुर्डुवाडीचे असुन त्यांचे वडिल डॉक्टर होते. कुर्डुवाडी येथील त्यांचे बंधू डॉ. जयंत करंदीकर हे वैद्यकीयसेवेबरोबर प्रवचनकार देखील आहेत. नितिन करंदीकर यांनी 35 वर्षे अॅटोमोबाईल क्षेत्रात काम केले असुन त्यांचा पुणे येथील सहकारनगरमध्ये संबंधित व्यवसाय आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवेसाठी रुग्णास वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी करंदीकर यांनी प्रारंभी गॅरेजमधील बंद दुचाकी दुरुस्त करुन त्याला जोडुन दोन चाकावरुन रुग्णवाहिका तयार केली.

हेही वाचा: संजय गांधी निराधार योजनेची बैठक न झाल्याने लाभार्थी वंचित- आरडे

त्यामध्ये असलेल्या त्रुटी त्यांनी दुर करुन पुन्हा ट्रॅक्टर ट्रॉली हा फॉर्म्युला वापरुन औषधे व रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक उपकरणासह रुग्णवाहिका स्वतः तयार केली. गेल्या काही काळात अशा तीन दुचाकी रुग्णवाहिका त्यांनी रोटरी क्लब ऑफ वेस्टएंडच्या तर्फे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, एटापल्ली, आहेरे या भागासाठी ऊडान फाउंडेशनकडे सुपुर्द केल्या आहेत.

करंदीकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतातील माल बाजारात आणण्यासाठी किंवा इतर माल वाहुन नेण्यासाठी दुचाकीला जोडणारी ट्रॉली तयार केली आहे. अशा दुचाकी ट्रॉली तयार करुन ते ग्रामीण भागात गरजू शेतक-यांना देणार आहेत. करंदीकर हे रोटरी क्लब व ऑफ वेस्ट एंड च्या सहकार्याने आदमबाग पुणे येथे शिक्षणासाठी राहणा-या सुमारे पन्नास गरजु व अनाथ मुलींना मदत करतात. ते, त्यांचे कुटुंबिय व मित्र विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवतात.

अशी आहे दुचाकी अॅंबुलन्सची रचना- दुचाकीच्या मागे वेल्डिंग करुन एक केबिन जोडण्यात आली आहे. त्यामध्ये एक रुग्ण व एक मदतनीस बसु शकतात. त्यामध्ये स्ट्रेचर, प्राथमिक आरोग्य सुविधा, सलाईन व्यवस्था आहे. दुचाकी केबीनचा भार सहज पेलु शकते. ही दुचाकी खाचखळग्यातून, कमी जागेतून जाउ शकते, वळु शकते. प्रवासात रुग्णाला कमीत कमी धक्के बसतात. प्रवासात डॉक्टर रुग्णवाहिकेत रुग्णावर तातडीचा व प्राथमिक उपचार करु शकतात.

loading image
go to top