शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 54 रुग्ण! निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री गप्प का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील निर्बंध
शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 54 रुग्ण! निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री गप्प का?

शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 54 रुग्ण! निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री गप्प का?

सोलापूर : शहरातील कोरोना आता हद्दपार होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहे. सध्या शहरात कोरोनाचे अवघे तीन रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील नऊ दिवसांत (25 मार्चपासून) शहरात कोरोनाचे अवघे चार रुग्ण वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल व्हावेत म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्न दिसत नाहीत. त्यामुळे आता ते पुढाकार घेणार का?, असा प्रश्‍न चित्रपटगृह मालक, क्रीडाप्रेमी, खेळाडू विचारू लागले आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे आणखी 20 कोटी! 31 मार्चपूर्वी वाटपाचे आदेश

शहरातील 26 प्रभागांपैकी बहुतेक प्रभाग कोरोनामुक्‍त झाले आहेत. मृत्यूदर असो वा रुग्णवाढीत सोलापूर शहर मागील दोन्ही लाटांमध्ये राज्यातील टॉपटेन शहरात होते. अनेक मंत्र्यांना सोलापूर शहराचा आवर्जुन दौरा करावा लागला होता. केंद्रीय पथकालाही सोलापूर शहरात यावे लागले होते. तिसऱ्या लाटेत शहरात दिलासादायक स्थिती राहिली. सात लाखांपैकी जवळपास सव्वासहा लाख व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील 17 हजार तर 18 वर्षांवरील 58 हजार व्यक्‍तींनी अजूनपर्यंत एकही डोस घेतलेला नाही. दुसरीकडे कोवॅक्‍सिनचा पहिला डोस घेऊन 28 दिवस तर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्यांपैकी बहुतेक लोक दुसरा डोस घ्यायला येत नसल्याचीही शहरात स्थिती आहे.

हेही वाचा: इंग्रजीचा पहिला पेपर कॉपीमुक्‍त! जिल्ह्यातील 927 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर

ग्रामीणमध्ये कोरोनाचे 54 रुग्ण
सोलापूर शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असतानाच ग्रामीणमधील संसर्गदेखील कमी झाला आहे. शनिवारी (ता.5) ग्रामीणमध्ये चार रुग्णांची भर पडली असून एकूण सक्रिय रुग्ण आता 54 इतके आहेत. त्यातील बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत. दुसरीकडे जवळपास चार लाख व्यक्‍तींनी अजूनही प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. लस शिल्लक असतानाही नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सगळे निर्बंध शिथिल होऊ शकलेले नाहीत. मात्र, कोरोना कमी होऊनही लस न टोचलेल्यांमुळे इतरांना वेठीस धरणे योग्य आहे का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांनी पालकमंत्र्यांना विचारला आहे.

Web Title: 3 In Urban And 54 In Rural Areas Active Pasients Why Is The Guardian Minister Silent About Lifting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top