Solapur : एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांना मिळणार लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Mahamandal

सोलापूर विभागांतील एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांना मिळणार लाभ

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ता. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी सर्व विभागांना दिले आहे. त्यामुळे एसटीच्या स्मार्ट कार्डचा सोलापूर विभागातील 72 हजार स्मार्ट कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. मुदत वाढीमुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयामध्ये 33 टक्के ते 100 टक्के पर्यंत सवलत देण्यात येते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरु केलेली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरू केलेले आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारांमध्ये जेष्ठ नागरिक आणि आणि सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी दरम्यानच्या काळात शासनाने गर्दी कमी करण्याबाबत विविध उपाय योजना अंमलात आणल्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्‍य नसल्याने तसेच या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत वाढ आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत देण्यात आली आहे. स्मार्ट कार्डला देण्यात आलेली मुदत वाढ ही अंतिम असून, यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे याबाबतची कल्पना ज्येष्ठ नागरिकांना देण्यात यावी असे वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यासह आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्ड तातडीने संबंधितास वितरीत करण्याबाबत व आगारात कोणत्याही लाभार्थींचे स्मार्ट कार्ड शिल्लक राहणार नाही अशा सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ज्या भागातएसटी बस सुरु असतील त्या भागातील नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा: ‘आदिनाथ’ भाडेतत्त्वावर दिला कसा?

कोरोनामुळे 23 मार्च 2020 पासून राज्यासह देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने महामंडळाने सुरुवातीस 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी 30 नोव्हेंबरपर्यंतच मुतदवाढ दिल्याची घोषणा करण्यात आली. आता तिस-यांदा स्मार्ट कार्ड योजनेला वाहतूक महाव्यवस्थापक यांनी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून ही मुदतवाढ अंतिम असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आकडे बोलतात

  • एकूण आगार - 9

  • एकूण विभागात बस - 700

  • एकूण कर्मचारी - 4 हजार 200

  • एकूण स्मार्ट कार्ड धारक - 72 हजार

  • एकूण चालक - 1 हजार 250

  • एकूण वाहक - 1 हजार 250

स्मार्ट कार्ड योजनेला तिस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेला लाभा घ्यावा. ज्या भागात एसटीची सेवा सुरु आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मिळालेली मुदतवाढ ही अंतिम असणार आहे.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

loading image
go to top