Solapur News : ड्रेनेजलाइनचा ३३४ कोटींचा आराखडा फायनल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation

Solapur News : ड्रेनेजलाइनचा ३३४ कोटींचा आराखडा फायनल

- प्रमिला चोरगी

सोलापूर : शहरात गेल्या आठ वर्षांपासून मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. यामध्ये अमृत, नगरोत्थान आणि आता अमृत दोन योजनेंतर्गत महापालिकेकडून ३३४ कोटींचा अंतिम आराखडा तयार केला आहे.

या योजनेतून १८८ कि.मी अंतरावर ड्रेनेजलाइन टाकण्यात येणार आहे. यामुळे शहरातील मलनिस्सारणाची व्यवस्था आता १०० टक्के पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेला गती आली असून तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. शहर विकासाच्या दृष्टीने ही योजना अतिशय महत्त्वाची आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने भक्कम पावले उचलली आहेत. केंद्र शासनाच्या साहाय्याने स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान राबविले आहे.

त्याचाच एक भाग अमृत अभियानाची सुरवात झाली. २०१४ पासून ही योजना अमलात आली. अमृत अभियानांतर्गत राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यासाठी निवड केली. शहरात गेल्या आठ वर्षांपासून अमृत योजनेतून पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाच्या मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत.

प्रत्येक घरातील सांडपाणी, मैलामिश्रित सांडपाणी, कारखान्याचे सांडपाणी हे उघड्यावर वाहिल्यामुळे साथीचे आजार ओढवले जात होते. तसेच दुर्गंधी व अस्वच्छतेचा सर्वाधिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असे. परंतु अमृत योजनेमुळे शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत असून प्रत्येक घरातील सांडपाणी, मैला वाहून नेण्यासाठी ड्रेनेजलाइनच सुविधा करण्यात आली.

परंतु शहरातील काही भागात नवीन तर काही ठिकाणी जुने ड्रेनेजलाइन आहे. नव्याने टाकण्यात आलेल्या ड्रेनेजलाइनच जोडणी अनेक ठिकाणी जुन्या लाइनला जोडली गेल्याने चेंबर तुंबणे, रस्त्यावर पाणी वाहणे आदी समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे.

तसेच काही ठिकाणी ड्रेनेजलाइनच कामे अर्धवट आहेत; तर आजही हद्दवाढ भागातील काही परिसरात ड्रेनेजलाइन टाकली गेली नाही. त्यामुळे योजनेचा मोठा कांगावा झाला तरी शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोचलेली नाही.

परंतु, शहरातील मलनिस्सारण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र शासनाने अमृत दोन अंतर्गत प्रशासनाला अंतिम आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत ही योजना पोचविण्यासाठी तब्बल ३३४ कोटींचा आराखडा तयार केला आहे. यातून संपूर्ण शहरातील मलनिस्सारणाची कामे पूर्णत्वास जाणार आहे. स्वच्छ शहर व सुंदर शहरासाठी या योजनेमुळे मोलाचे योगदान लाभणार आहे.

आकडे बोलतात

 • अमृत २ योजनेचा आराखडा : ३३४ कोटी

 • ड्रेनेजलाइन एकूण अंतर : १८८ कि.मी

 • शासन निधी वर्गवारी : केंद्र ४० अन॒ राज्य ३०

 • महापालिकेचा निधी हिस्सा : ३० टक्के

ड्रेनेजची सद्यःस्थिती (आकडे किलोमीटरमध्ये)

 • शहरात ड्रेनेजसाठीची एकूण लांबी : ११४१

 • शहरातील जुनी ड्रेनेजलाइन : ३६१.४८

 • आमदार, खासदार, मूलभूत सुविधांमधून झालेले काम : ७३.७०

 • नगरोत्थान योजनेतील ड्रेनेजलाइन : १६३. ९१

 • स्मार्ट सिटी योजनेंतर्गत : ९०

 • अमृत योजनेतील ड्रेनेजलाइन : २९७.७३

 • आतापर्यंत झालेले काम : ८८९

 • अमृत २ मध्ये होणारे काम : १८८ (प्रस्तावित)

शहरातील उर्वरित ठिकाणचे ड्रेनेजलाइन कामासाठी ३३४ कोटींचा अंतिम आराखडा तयार करून एमजीपीकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. अमृत दोन मध्ये शहरातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक भागाचा समावेश करण्यात आला आहे.

-जाकीरहुसेन नाईकवाडी, ड्रेनेजविभागप्रमुख