
यंदा शेतकऱ्यांना मिळणार 4200 कोटींचे कर्ज! तीन लाखांच्या कर्जावर शून्य टक्के व्याज
सोलापूर : नववर्षात 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामासाठी चार हजार 200 कोटींचे पीक कर्जवाटप केले जाणार आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही खरिपात कर्ज मागणी सर्वाधिक होते. त्यामुळे यंदा रब्बी व खरीप हंगामात समसमान कर्जवाटप केले जाणार आहे.
हेही वाचा: मोठा निर्णय! शनिवारी, रविवारीही आता पूर्णवेळ भरणार शाळा
सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ऊस गाळपात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही मागील काही वर्षांत जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार कोटींचे कर्जवाटप केले जाते. शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढू लागल्याने यंदा नाबार्डच्या सर्व्हेनुसार शेतकऱ्यांना चार हजार 200 कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. 1 एप्रिलपासून (नववर्षात) रब्बी व खरीप हंगामात मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्याचा सीबिल स्कोअर किमान 650 पेक्षा अधिक आहे, त्यांना सहजपणे कर्ज मिळणार आहे. तत्पूर्वी, तो शेतकरी कोणत्याही बॅंकेचा तथा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, असाही निकष लावण्यात आला आहे. यंदा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी वाढीव कर्ज दिले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव बॅंकांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या माध्यमातून राज्य सहकारी बॅंकेला पाठवला आहे. त्यानंतर बॅंकांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित झाले असून, त्यानुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत केले जाणार आहे.
हेही वाचा: शेतीसाठी उजनीतून 5 एप्रिलला सुटणार पाणी! धरणात 99.98 टीएमसी पाणी
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे आता यंदा खरीप व रब्बीसाठी शेतकऱ्यांना 50-50 टक्के कर्जवाटप होईल. 1 एप्रिलपासून पीक कर्जवाटप करण्याचा कृती आराखडा तयार केला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक
हेही वाचा: पेट्रोल 49.02 तर डिझेलची मूळ किंमत 50.50 रुपये! पण, द्यावे लागतात 113 रुपये
ठळक बाबी...
- नाबार्डकडून झालेल्या सर्व्हेनुसार यंदा खरीप-रब्बीसाठी बॅंका कर्जवाटप करतील
- जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार खरीप-रब्बीसाठी कर्ज
- शेतकऱ्यांना 4200 कोटींचे कर्जवाटप होणार; बॅंकांना उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार
- बॅंकांना यंदा पात्र शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्जवाटप करावे लागणार
- मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना जवळपास साडेचारशे कोटींचे वाढीव पीककर्ज
Web Title: 4200 Crore Loan To Farmers This Year Zero Interest On 3 Lakh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..