esakal | प्रवाशांनो, आरटीओने ठेवलाय जास्तीच्या भाड्यावर वॉच ! एसटीच्या दीड पटपेक्षा अधिक भाडे खासगी वाहनाला देऊ नका 
sakal

बोलून बातमी शोधा

Travel Bus

दिवाळीच्या अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन खासगी बस वाहतूकदार परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवत आहेत. शंभर टक्के प्रवासी वाहतुकीसाठीचे नियम डावलून सर्रास अतिरिक्त भाडे घेऊन प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्याने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

प्रवाशांनो, आरटीओने ठेवलाय जास्तीच्या भाड्यावर वॉच ! एसटीच्या दीड पटपेक्षा अधिक भाडे खासगी वाहनाला देऊ नका 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीच्या अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन खासगी बस वाहतूकदार परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवत आहेत. शंभर टक्के प्रवासी वाहतुकीसाठीचे नियम डावलून सर्रास अतिरिक्त भाडे घेऊन प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्याने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

राज्य सरकारने नुकतेच खासगी बस वाहतूकदारांना शंभर टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्यासाठी कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे, प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरीअंति प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. याशिवाय एसटी बस भाड्याच्या फक्त दीडपट भाडेच खासगी बस वाहतूकदार घेण्याची परवानगी आहे; मात्र सध्या राज्य सरकारने आखून दिलेल्या नियम व अटींची पायमल्ली करून खासगी बस वाहतूकदार प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे मुंबई, क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, बोरिवली, दादर, ठाणे, पनवेल, वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर नागपूर, चंद्रपूर, धुळे येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी बस वाहतूकदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, सोमवारपर्यंत कारवाईचा अहवालही परिवहन आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. 

परिवहनच्या "या' सूचनांना बगल 

  • आरक्षण चौकशी कक्षातील स्वच्छता करावी 
  • कर्मचाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा 
  • विनामास्क प्रवाशांना प्रवेश देऊ नये 
  • बसच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे 
  • प्रवाशांची थर्मल गनने तपासणी करावी 
  • एसटीच्या दीडपटपेक्षा जास्त भाडे आकारू नये 

प्रवाशांनी तत्काळ करावा संपर्क 
सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, की दिवाळीनिमित्त परगावावरून सोलापूरला येणाऱ्या, तर सोलापूरवरून परगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. या काळात एसटी, रेल्वे तसेच खासगी बसने प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. या परिस्थितीत काही खासगी बसचालक ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे आकारतात. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही ठरलेल्या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथके यासंबंधीची एसटी स्टॅंड, जुना पूना नाका आणि बाळे या ठिकाणी तपासणी करीत आहेत. जर खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी वाहतूक अथवा अतिरिक्त भाडे आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top