
मंगळवारच्या मतमोजणी साठी महसूल प्रशासन सज्ज विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीवर बंदी
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील रविवारी झालेल्या निवडणुकीच्या मंगळवार ता 20 रोजी होणाऱ्या मत मोजणीची तयारी पूर्ण झाली असून, एकूण चार फेऱ्यात निकाल हाती येणार आहेत. मत मोजणीसाठी एकूण 36 कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. या संदर्भात निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी दिलेल्या माहिती नुसार, मतमोजणी मंगळवारी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयात संपन्न होणार आहे. मत मोजणीसाठी एकूण नऊ टेबल ची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबल साठी चार कर्मचारी असणार आहेत.
मतदान हे मतदान यंत्राद्वारे झाल्याने एका तासात सर्व निकाल हाती येणार आहेत. चार फेऱ्यात नऊ गावांची मतमोजणी संपणार आहे. मत मोजणीसाठी उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधीस ओळखपत्र असल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. एका ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान मत मोजणी कशी करावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे ही यादव यांनी सांगितले.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मत मोजणी झाल्यावर उमेदवाराची विजय मिरवणूक काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवारांना भारतीय दंडविधानाच्या 149 प्रमाणे नोटीसा दिल्या आहेत. ज्या गावाची निवडणूक झाली आहे त्या गावात एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. तहसील कार्यालय प्रवेशव्दार, शिवाजी चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू आहे. त्याचे उल्लंघन केल्यास अथवा विजयी मिरवणूक काढल्यास उमेदवार व त्याच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.