थक्क करणारा उत्साह ! वयाच्या 67 व्या वर्षी एलएलबी फर्स्ट क्‍लास पास !!

Somase
Somase
Updated on

कुर्डुवाडी (सोलापूर) : आर्थिक अडचणींवर मात करत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रेल्वेतून राजभाषा अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले, नाट्यक्षेत्रात रंगकर्मी म्हणून ठसा उमटवलेले कुर्डुवाडी येथील दिगंबर सोमासे हे सेवानिवृत्तीनंतर कायद्याचे शिक्षण घेऊन वयाच्या 67 व्या वर्षी एलएलबीची पदवी परीक्षा फर्स्ट क्‍लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 

ज्ञान संपादन करण्याची व शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असेल तर व्यक्ती कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिगंबर सोमासे हे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण कुर्डुवाडी येथील नूतन विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण कुर्डुवाडी येथील महाविद्यालयात झाले. बीएच्या द्वितीय वर्षात असताना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुंबई येथे कामासाठी जावे लागले. तेथील रेल्वे कारखान्याच्या बाहेर कॅंटीनमध्ये काम केले. सुदैवाने त्या वेळी रेल्वेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये त्यांना वर्ग चारची नोकरी मिळाली. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याचा फायदा झाला. 

ते प्रमोशन मिळवत राजभाषा अधिकारी पदापर्यंत पोचले. त्यांची तीन मुले व एक मुलगी चांगले शिक्षित असून, एक मुलगा प्रवीण हा रेल्वेत, दुसरा मुलगा प्रताप खासगी कंपनीत नोकरीस तर तिसरा मुलगा अजित व मुलगी वैशाली कायद्याचे शिक्षण घेत आहेत. 

नाटकांची आवड असल्याने दिगंबर सोमासे यांनी महाविद्यालयीन व नोकरीच्या काळातही रंगकर्मी म्हणून 30 ते 35 नाटकांत काम केले. दरम्यानच्या काळात त्यांनी लग्नानंतर बीए (इंग्रजी)ची अंतिम पदवी परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले. सोलापूर येथे नोकरीस असताना मुंबई येथे अनुवाद प्रशिक्षणात सुवर्ण पदक मिळवले. त्या दरम्यान त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सोलापूर येथील महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न केला; परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्‍य झाले नाही. 

सेवानिवृत्तीनंतर शिक्षणाची तीव्र इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी पंढरपूर येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. कुर्डुवाडी - पंढरपूर दररोज अपडाउन करावे लागत असे. परंतु पोटाच्या आजारामुळे सुमारे दोन वर्षे त्यांचे शिक्षण थांबले. आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा शिक्षण सुरू केले. वयाच्या 67 व्या वर्षी ते एलएलबीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तीव्र इच्छा व कष्ट घेण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसल्याचे श्री. सोमासे म्हणाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com