साहेब, आतातरी गावाकडं बघा ! ग्रामीण भागात कोरोना नियमांची ऐशीतैशी; ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग

corona_virus
corona_virus

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना उपायांसह निर्बंध तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात असली तरी ग्रामीण भागात मात्र कारवाईचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील हॉटेल्स, पानटपरी, गाव कट्ट्यांवर आजही गप्पा रंगत आहेत. त्यामुळे "साहेब, आता एकदा तरी गावाकडं बघाच!' असे सुज्ञ नागरिक आवर्जून बोलत आहेत. 

जिल्ह्यातच कोरोना रुग्णसंख्येत वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगोला तालुक्‍यात आत्तापर्यंत एकूण 3 हजार 664 रुग्णसंख्या झाली आहे. यामध्ये 354 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. 326 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 76 रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. 188 रुग्ण होम आयशोलेशनमध्ये आहेत. आजपर्यंत तालुक्‍यातील 66 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 3 हजार 244 रुग्ण आतापर्यंत बरेच झाले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने सरकार विविध उपाययोजना करीत आहे. कोरोना नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. शहरात याबाबत मोठी कारवाई होत असल्याने येथील नागरिक विनाकारण कमी बाहेर फिरताना दिसत असले तरी ग्रामीण भागात मात्र अनेक जण विनाकारण बाहेर फिरताना, गप्पा मारताना दिसून येत आहेत. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये नागरिकांमध्ये जशी भीती होती तशी सध्या दिसून येत नाही. तालुक्‍यातील ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंग नियम आहे की नाही अशी अवस्था दिसून येते. अनेक जण ग्रामीण भागात हॉटेल्स, पानटपरी, दूध संकलन केंद्र, गाव कट्ट्यावर बेफिकीरपणे मास्क न लावता गप्पा मारताना दिसून येतात. एकीकडे कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सरकार विविध उपाययोजना करीत असले तरी सांगोला तालुक्‍यातील ग्रामीण भागात मात्र नियम मोडणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. 

नवीन ऑक्‍सिजनसह 40 बेड अधिग्रहित 
तालुक्‍यातील वाढीव कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता पाच हॉस्पिटलमधील ऑक्‍सिजनसह 40 बेड अधिग्रहित करण्यात आले आहेत. यामध्ये मोहन हॉस्पिटल - 10, माऊली हॉस्पिटल - 4, साळे हॉस्पिटल अँड आयसीयू - 7, आनंद हॉस्पिटल - 15, युगंत हॉस्पिटल - 4 असे एकूण पाच हॉस्पिटलमधील चाळीस बेड उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे - पाटील यांनी दिली. 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग 
एकीकडे कोरोना रुग्णांना बेड मिळणेही मुश्‍कील झाले असताना तालुक्‍यातील ग्रामीण भागात मात्र चौकाचौकांत, दुकानांसमोर विशेषतः हॉटेलमध्ये नागरिक मास्क न घालता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गप्पा मारत बसलेली दिसतात. नियम मोडणाऱ्याविरोधात कारवाई होत नसल्याने नागरिकही बेफिकीर असल्याचे दिसून येतात. 

स्टेशनरीचे झाले किराणा दुकान व हॉटेलचे झाले बेकरी स्टॉल 
शासनाने कोरोना रुग्णांचे चेन ब्रेक करण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. यामध्ये अत्यावश्‍यक सेवांना सवलत दिली आहे. ग्रामीण भागामध्ये स्टेशनरीची दुकानेही अत्यावश्‍यक सेवेत असलेली किराणा दुकाने झाली आहेत तर हॉटेल बंद करण्यापेक्षा त्यामध्येच बेकरीचे पदार्थ ठेवून अशी हॉटेल्स बेकरी स्टॉल म्हणून सुरू केली जात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com