esakal | Video पेटला उजनी धरणातील पाण्याचा प्रश्‍न ! "जनहित', "प्रहार'चे जलाशयातच आंदोलन

बोलून बातमी शोधा

Ujani Agitaion
Video पेटला उजनी धरणातील पाण्याचा प्रश्‍न ! "जनहित', "प्रहार'चे जलाशयातच आंदोलन
sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यासाठी पळविले, याच्या निषेधार्थ व तो निर्णय रद्द व्हावा यासाठी जनहित शेतकरी संघटना, प्रहार संघटनेने शनिवारी (1 मे) उजनी जलाशयातच आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री येऊन निर्णय रद्द झाल्याचे सांगत नाहीत, तोपर्यंत पाण्याबाहेर येणार नाही; वेळप्रसंगी आम्ही पाण्यात पोहून मरू, अशी भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उजनीचे पाणी पेटले आहे.

या वेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, उजनीतील पाच टीएमसी पाणी पालकमंत्री भरणे यांनी सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली इंदापुरातील बावीस गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी पळविल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे, तर विविध शेतकरी संघटना याच कारणासाठी आक्रमक झाल्या आहेत. पाच टीएमसी पाणी पळविल्याने जिल्ह्याचे एक आवर्तन कमी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. याचा आता विचार केला नाही तर शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी लाखोंची कर्जे घेतली आहेत, ती जमिनी विकून फेडावी लागतील, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यात अनेक धरणे आहेत, त्यातून इंदापूरच्या बावीस गावांची तहान भागू शकते, हे माहीत असूनही जाणून-बुजून व हेतुपुरस्सरपणे उजनीतून पाणी पळवले आहे. पाणी केवळ पाच टीएमसी नावालाच आहे, ते जास्तही उचलले जाऊ शकते.

हेही वाचा: सोलापूरला "बाप'च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध ! हेवेदावे विसरून आतातरी सर्वपक्षीय नेते एकत्र येतील का?

दरम्यान, सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री येऊन निर्णय घेत नाहीत तोपर्यंत पाण्यातच राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. वेळ प्रसंगी आम्ही पाण्यात पोहून मरू मात्र हक्काचे पाणी देणार नाही, अशी ठोस भूमिका देशमुख यांनी घेतली आहे. दरम्यान, या पळविलेल्या पाण्याचा कारखानदारीवरही मोठा परिणाम होणार आहे, कारण पाणी नसल्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होणार आहे. परिणामी शेतकरी व कारखानदारांचे मोठे नुकसान होणार आहे. सत्ताधारी आमदारांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या संघर्षात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही देशमुख यांनी या वेळी केले.

या आंदोलनात देशमुख यांच्यासह "प्रहार'चे अतुल खुपसे, संजय बाबा कोकाटे, माऊली हळवणकर, बळिराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जनशक्ती संघटना पस्तीस गावे उपसा सिंचन संघर्ष समिती, बापू मेटकरी, माऊली जवळेकर व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.