वाढेगावातील तीन नद्यांच्या संगमावरील प्राचीन शिवमंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ancient Shiva temple at confluence of three rivers in Kodegaon

वाढेगावातील तीन नद्यांच्या संगमावरील प्राचीन शिवमंदिर

सांगोला - वाढेगाव (ता. सांगोला) येथील माण, कोरडा व अफ्रुका या तीन नद्यांच्या संगमावर प्राचीन असे शिवमंदिर आहे. मंदिर छोटे असले तरी निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. तिन्ही नद्या वाहू लागल्या की एखाद्या बेटावर गेल्याची जाणीव होते. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.

सांगोल्यापासून अगदी थोड्या अंतरावर (पाच किलोमीटर) सोलापूर महामार्गावर वाढेगाव आहे. गावापासून जवळच माण, कोरडा व अफ्रुका या तीन नद्यांच्या संगमावर हे प्राचीन असे शिवमंदिर आहे. विशेष म्हणजे, तिन्ही नद्या उत्तर वाहिन्या आहेत. या नद्या उत्तर वाहिन्या असल्यामुळे संगमाच्या ठिकाणाला काशीसमान समजले जाते. अनेक साधूमहाराज या ठिकाणी वास्तव्यास येतात. मंदिराच्या बाजूचे तीन नद्यांचे पात्र, मंदिर परिसरातील असलेले मोठे वृक्ष हे निसर्गरम्य वातावरण पाहून एक वेगळ्या प्रकारचे मनाला समाधान मिळत असल्याचे भाविक सांगतात. ‘संगमावरील महादेव’ अशी सर्वत्र या ठिकाणची ओळख आहे.

या ठिकाणचे पुरातन काळातले नंदी, साधू महाराजांची समाधी तसेच फार वर्षांपूर्वीचे झाड व त्याखाली साधू महाराजांची बसण्याची गादी आदी बाबी हे मंदिर खूप पुरातन असल्याचे साक्ष देतात. शासन स्तरावरून या मंदिर परिसराचा विकास झाला तर चांगल्या प्रकारचे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ होईल. पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. परंतु ग्रामीण भागातील असा पुरातन नैसर्गिक कुशीत वसलेला मंदिर परिसर पर्यटन स्थळाच्या दृष्टीने विकास होणे आज गरजेचे आहे.

मंदिरालगत जणू बेटच वसवले

या मंदिराच्या मागच्या बाजूसही तिन्ही नद्यांच्या पाण्यामुळे मातीचा चढ तयार झाला आहे. तोच मातीचा चढ व्यवस्थित करून त्यावर वड, पिंपळ, चिंच, बेल, जांभूळ, करंज व इतर झाडे लावली आहेत. ते समुद्रातील बेटासारखे झाले असून पाणी आल्यानंतर हे बेट बघण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत असते.

ठळक बाबी...

  • तीन नद्यांच्या संगमावर प्राचीन असे शिवमंदिर

  • संगमावरील तिन्ही नद्या उत्तर वाहिन्या

  • उत्तर वाहिन्या नद्यांमुळे काशीसमान महत्त्व

  • मंदिर परिसर तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकसित व्हावे

  • मंदिरालगत घाट बनविण्यात यावा

  • गावापासून मंदिरापर्यंत स्वतंत्र पूल बनवावा

Web Title: Ancient Shiva Temple At Confluence Of Three Rivers In Kodegaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..