esakal | अनिल सावंत भगीरथांच्या प्रचारात ! आवताडे व परिचारक गटाची प्रतिष्ठा पणाला

बोलून बातमी शोधा

Sawant Group

लवंगीतील भैरवनाथ शुगर्सवर बुधवारी सावंत गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत उपस्थित होते. या वेळी भगीरथ भालकेंना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याची शपथ सावंत परिवाराकडून घेण्यात आली. 

अनिल सावंत भगीरथांच्या प्रचारात ! आवताडे व परिचारक गटाची प्रतिष्ठा पणाला

sakal_logo
By
महेश पाटील

सलगर बुद्रूक (सोलापूर) : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशी निवडणुकीतील रंगत वाढत चालली आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. दिवंगत आमदार भालकेंना मानणारा मोठा मतदार वर्ग या भागात आहे. त्यातच त्यांच्या अकाली निधनाने तयार झालेली भावनिक लाटही तितकीच प्रखर आहे. शिवाय सर्वसामान्य जनतेपर्यंत असणाऱ्या दिवंगत भालकेंच्या संपर्काचा फायदा भगीरथ भालकेंना होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, लवंगीतील भैरवनाथ शुगर्सवर बुधवारी सावंत गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत उपस्थित होते. या वेळी भगीरथ भालकेंना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याची शपथ सावंत परिवाराकडून घेण्यात आली. 

या वेळी भगीरथ भालके म्हणाले, आजपर्यंत सावंत परिवाराची भालके कुटुंबास छुप्या पद्धतीने मदत होती, पण यापुढे सावंत परिवाराची उघड उघड साथ मला मिळत असल्याने सावंत परिवाराचे माझ्यावर खूप उपकार राहणार आहेत. 

सावंत परिवाराची ताकद 
दरम्यान, रांजणी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या उद्‌घाटनावेळी लवंगी येथील भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनीही आपली ताकद भगीरथ भालके यांच्या पाठीशी लावली आहे. लवंगी, सलगर बुद्रूक, सलगर खुर्द या परिसरात सावंत परिवाराची ताकद मोठी आहे. त्यामुळे याचा फायदाही भगीरथ भालकेंना होणार आहे. या निवडणुकीपूर्वी हीच ताकद विरोधी बाजूला होती. 

दक्षिण मंगळवेढ्यात आवताडे गटाची मोठी ताकत आहे. त्यातच परिचारक गटामुळेही ती ताकद दुप्पट झाल्याचे जरी पाहायला मिळत असले तरी भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे आवताडे गटाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर आवताडे गटाची ताकद मोठी आहे. शिवाय झेडपी, पंचायत समिती, दामाजी शुगरच्या माध्यमातून समाधान आवताडे यांचीही ताकद या भागात मोठी आहे. 

दरम्यान, या भागातील परिचारक गटाची ताकद कागदावर जरी कमी वाटत असली तरी त्यांना मानणारा मतदारही या भागात मोठ्या प्रमाणात आहे. 
एकूणच, भगीरथ भालकेंच्या पाठीशी दिवंगत आमदार भारत भालकेंची असलेली लोकप्रियता व त्यांनी केलेले काम, शिवाय त्यांच्या अकाली निधनाने तयार झालेली भावनिक लाट तर दुसरीकडे समाधान आवताडे यांना घरातूनच झालेला विरोध, शिवाय परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची द्विधा मन:स्थिती यावर या भागातील मतदारांचा कौल कुणाला मिळणार, त्याच भावी आमदाराच्या गळ्यात यशाची माळ पडणार. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल