Solapur News : जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे; 'प्रहार' च्या सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Animals in Collector office case registered against six persons of Prahar solapur police

Solapur News : जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे; 'प्रहार' च्या सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : विविध प्रश्नांवर आवाज उठवून वेगळी आंदोलने करण्यात प्रसिद्ध असलेल्या प्रहार संघटनेने असेच आगळे-वेगळे आंदोलन काल सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते. चक्क जनावरे आणून ती कार्यालयात बांधण्याचे आंदोलन केले होते, हे आंदोलन प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे, याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विनापरवानगी गैर कायद्याची मंडळी जमवून जनावरे आणून बांधल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षसह सहाजणांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार शब्बीर तांबोळी यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, शहराध्यक्ष जमीर शेख, मुजाहिद रमजान सय्यद, मुस्तफा जाकीर हुसेन रचभरे, मोहसीन नजीर तांबोळी, अकिब नाईकवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे आहेत. मंद्रूप येथील एमआयडीसीमध्ये शेत जमीन गेलेल्या काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून आंदोलन सुरू होते. गुरुवारी या आंदोलनात प्रहार संघटनेने उडी घेतली. काही शेतकऱ्यांसह जनावरे घेऊन संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि थेट जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात नेली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेठीस आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा आणला असे कारण नमूद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.