वैरागच्या अर्णव शैक्षणिक संकुलाला आग ! शालेय साहित्य, दफ्तर, फर्निचर व संगणक जळून खाक 

Arnav Prashala
Arnav Prashala

वैराग (सोलापूर) : वैराग येथे अर्णव शैक्षणिक संकुलामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यामध्ये संस्थेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे व इतर शालेय साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचा ऐवज भस्मसात झाला. एका खोलीत लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण इमारतीमध्ये आगीचे व धुराचे लोट पसरले होते, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण यांनी वैराग पोलिसांत दिली. 

या आगीत संस्थेचे सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर, अर्णव माध्यमिक हायस्कूल व निवासी वसतिगृहाचे शालेय महत्त्वपूर्ण दस्तऐवज, दोन कपाटे, किमती फर्निचर, कॉम्प्युटर व इतर साहित्य जळून लाखो रुपयाचा मुद्देमाल खाक झाला आहे. या घटनेची नोंद अकस्मात जळीत म्हणून वैराग पोलिसांत झाली आहे. 

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैराग येथील सासुरे फाटा येथे असलेल्या अर्णव शैक्षणिक संकुलामध्ये मुख्याध्यापक कार्यालय नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे या कार्यालयातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे, दस्तऐवज, कपाटे, कॉम्प्युटर व इतर साहित्य बाजूच्या हॉलमध्ये ठेवले होते. या हॉलमध्ये शुक्रवारी पहाटे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आतील साहित्य व कागदपत्रांना आग लागली. त्यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले असल्याची खबर मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण यांनी वैराग पोलिसांत दिली. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा बंद होती. कर्मचारी व शिक्षक सकाळी साडेआठच्या सुमारास शाळेत आले. त्या वेळी आग लागल्याचे प्रशांत चव्हाण व शाळेचा शिपाई नागेश जाधव यांच्या लक्षात आले. तातडीने अविनाश गोरे, नागेश जाधव, यशवंत बारंगुळे, सोमनाथ घायतिडक आदींनी पाण्याचे फवारे मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत किमती साहित्य भस्मसात होऊन इमारतीच्या खिडक्‍यांच्या काचा फुटल्या होत्या व इतर साहित्यही जळून राख झाली होती. 

घटनास्थळी वैराग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी हळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. अर्णव शैक्षणिक संकुलामध्ये कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कार्यालयातील साहित्य व वस्तू जवळच्या हॉलमध्ये हलवले होते. या खोलीत शॉर्टसर्किट होऊन आग लागून साहित्य जळीत झाल्याची माहिती मला आमच्या कर्मचाऱ्याकडून मिळाली. मी संस्थेच्या कामासाठी मुंबई येथे आहे. झालेली आगीची घटना दुर्दैवी आहे, असे संस्थेचे सचिव रवींद्र कापसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com