एकाच पावसात शहर पाण्यात; सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rains in Solapur

एकाच पावसात शहर पाण्यात; सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद

सोलापूर - शहरात गुरुवारी पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकाच पावसात शहर पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात सकाळपासून मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी ११.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यानंतर दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. सायंकाळपर्यंत शहरात ७ मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पहिल्याच पावसात महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी थांबल्याने ठिकठिकाणी तळी निर्माण झाली होती. पाण्याचा निचरा होण्यास जास्तीचा वेळ गेल्याने नागरिक व वाहनधारकांना पाण्यातूनच वाट काढत मार्गस्थ व्हावे लागत होते.

होटगी रोडवर महावीर चौक, इदगाह मैदानजवळली पूल, चेतन फौंड्रीजवळ पाणी साचले होते. तर अशोक चौक ते गुरुनानक चौक मार्गावरील खड्डे पाण्याने भरल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. शहरात गॅसलाईन, महानेटसाठी रस्ते खोदले गेले. परंतु, हे रस्ते पूर्ववत करण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेला मातीचा ढिगारा, रस्त्यावर दलदल निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. एकाच पावसात शहर पाण्यात गेले असून महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे.

गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. मोहोळ, नरखेड, पेनूर, पंढरपूर शहर व परिसर, पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर), पिंपळनेर (ता. माढा), मंद्रूप, मंगळवेढा शहर व ग्रामीण परिसर आदी ठिकाणी पाऊस पडला. उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची जादा आवश्यकता असते. अशा पिकांना पावसाचे पाणी मिळाल्याने ऊस, कडवळ, मका आदी पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही चार हजार एकर द्राक्ष बागा उतरविण्याचे काम बाकी आहे. यापूर्वीच दर पडल्याने हैराण झालेले द्राक्ष बागायतदार या पावसामुळे अधिकच अडचणीत आले आहेत.

Web Title: Arrival Of Premonsoon Rains In Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top