Ashadhi Wari : यंदा चंद्रभागेच्या वाळवंटी वाढतेय वैष्णवांची दाटी;विदर्भ, मराठवाडा, कोकणातील पेरण्यांचा परिणाम,आषाढीला भाविकांच्या विक्रमी गर्दीची शक्यता

जून महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे पेरण्या उरकल्या आहेत. परिणामी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आतापर्यंत सहा लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

माळशिरस : जून महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे पेरण्या उरकल्या आहेत. परिणामी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आतापर्यंत सहा लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे यंदा आषाढी वारीला विठुरायाच्या पंढरीत विक्रमी गर्दीची शक्यता सोहळा प्रमुखांनी व्यक्त केली.

संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहूतून २८ जून रोजी झाले तर २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यंदा दोन्ही सोहळ्यात देहू आणि आळंदीतूनच वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. पालखी सोहळ्यांतील दिंड्यांव्यतिरिक्त सोहळ्याच्या पुढे मोठ्या संख्येने वारकरी चालत आहेत. मोकळे चालणारे वारकरी माऊलींच्या सोहळ्याच्या पुढे दोन मुक्काम चालत आहेत. दररोजच्या वाटचालीसाठी पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी सहा वाजता मार्गस्थ होतो. मात्र, पहाटे तीन-चार वाजण्यापूर्वीच वारकरी पुढे चालत निघत असल्याचे चित्र आहे. वाहनांची संख्याही दरवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत निवृत्तिनाथ, संत एकनाथ महाराज या पालखी सोहळ्यांसमवेतही वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच, सुमारे पन्नासहून अधिक संत, सद्गुरूंचे पालखी सोहळे पंढरीच्या वाटेवर वेगवेगळ्या भागातून चालत आहेत. शिवाय, आषाढी एकदशीसाठी दोन-तीन दिवस अगोदर पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही जास्त असणार आहे. त्यामुळे यंदा आषाढी वारी विक्रमी भरण्याची शक्यता असल्याचे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

आळंदीपासूनच यंदा वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. वारकऱ्यांच्या वाढीव संख्येबाबत प्रशासनाला उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. माऊलींच्या रथापुढे चालणाऱ्या वारकऱ्यांनी सोहळ्याची शिस्त आणि नियम पाळून दिंड्यांमध्ये अथवा रथाच्या मागे चालावे.

- योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

राज्यात पेरण्यांसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा वारीत वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केल्याने गर्दी असूनही योग्य ती सुविधा सोहळ्याला मिळाली. आता सोलापूर जिल्ह्यात सोहळ्याने प्रवेश केला आहे. त्यांनाही वारकऱ्यांच्या गर्दीबद्दल कल्पना दिली आहे.

- माणिक महाराज मोरे, सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

मी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत आहे. आमच्या भागातून दिंडी आली आहे. शिवाय, जूनच्या पहिल्या आठवड्यात आमच्या भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या उरकून आम्ही वारीला आलो आहोत. दरवर्षीच्या तुलनेत आमच्या भागातील दिंड्यांतील संख्येत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे.

- सीताराम पवार, वारकरी, रा. जांबोरा, जि. बुलडाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dhonda month son-In-Laws gift
Alandi Devasthan Takes Firm Stand Over Warkari Facilities Ahead of Ashadhi Wari
Sant Namdev Dnyaneshwar Tirthayatra
Coordination Key for Palkhi Stay in Pune, Final Decision on April 13
Marathi News Esakal
www.esakal.com