भ्रष्टाचाराचा अड्डा बनली झेडपी! विरोधी पक्षनेते बळिराम साठेंचा आरोप | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भ्रष्टाचाराचा अड्डा बनली झेडपी! विरोधी पक्षनेते बळिराम साठेंचा आरोप
भ्रष्टाचाराचा अड्डा बनली झेडपी! विरोधी पक्षनेते बळिराम साठेंचा आरोप

भ्रष्टाचाराचा अड्डा बनली ZP! विरोधी पक्षनेते बळिराम साठेंचा आरोप

सोलापूर : लोकहिताची कामे करताना जाणीवपूर्वक अडवणूक करून लाच (Bribe) मागितली जात आहे. पूर्वीची आणि आताची झेडपी (Solapur ZP), यात खूप फरक झाला असून पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बळिराम साठे (Baliram Sathe) यांनी केला आहे. दरम्यान, लाच प्रकरणात अडकलेल्या बसवराज स्वामीला (Basavraj Swamy) यापूर्वी दोनदा वॉर्निंग दिली होती, असेही ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर आता प्रतिनियुक्‍तीवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठविले जाणार आहे.

हेही वाचा: दिवाळी सुट्टीचा घोळ मिटला! 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार शाळा

जनतेचा सर्वाधिक संपर्क येणाऱ्या व आर्थिक व्यवहाराशी संबंधित विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो, असे निरीक्षण लाचलुचपत विभागाचे आहे. लाच प्रकरणात पोलिस, महसूल, जिल्हा परिषद हे विभाग अव्वल आहेत. दरम्यान, मार्चएंड व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर असल्याने भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. बांधकाम विभागाकडून कामाची 'एमबी' करण्यासाठी आणि मंजूर कामाचे पैसे वितरीत करण्यासाठी लाच मागितली जाते, असाही काहींचा अनुभव आहे.

दरम्यान, समाज कल्याण विभागात कार्यरत असलेला बसवराज स्वामी हा मूळ पशुसंवर्धन विभागाचा कर्मचारी आहे. प्रतिनियुक्‍तीवर त्याला समाज कल्याण विभागाचा कक्ष अधिकारी म्हणून पदभार दिला होता. कोरोनामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज दीड-दोन वर्षे बंदच होते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू झाले असून, लाच घेण्याचे प्रकार वाढू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर झेडपीची बदनामी रोखणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्हा परिषदेच्या बहुतेक विभागांतून काम करून घेताना टक्‍केवारी किंवा लाच मागितली जाते. झेडपीत 100 टक्‍के भ्रष्टाचार सुरू असून अनेकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्यावेळी संबंधिताला ताकीद देऊन ते काम करण्यास सांगितले.

- बळिराम साठे, विरोधी पक्षनेते, सोलापूर जिल्हा परिषद

सर्वसामान्यांच्या कामाची अडवणूक करून त्यांना पैसे मागणाऱ्यांवर आता थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. प्रतिनियुक्‍तीवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठविले जाणार आहे. लाच प्रकरणात अडकलेल्या बसवराज स्वामीला निलंबित केले आहे.

- दिलीप स्वामी, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर

हेही वाचा: सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!

निवडणुकीच्या तोंडावर टक्‍केवारीचे ग्रहण

जिल्हा परिषदेची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला होणार असून आता केवळ अडीच-तीन महिन्यानंतर निवडणूक आहे. तत्पूर्वी, विधान परिषदेची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी हात धुवून घेण्याच्या हेतूने प्रत्येक कामात टक्‍केवारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. हायमास्ट दिवे, रस्त्यांची कामे, दलित वस्ती सुधार योजनेसह विविध कामांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी झेडपी अध्यक्षांवरच तसा आरोप झाला होता. टक्‍केवारी घेण्यामागे नेमका कोण, याचा गुप्तपणे शोध घेण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate
loading image
go to top