esakal | माढ्याच्या आमदार पुत्रासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा ! बार्शी न्यायालयाचे आदेश

बोलून बातमी शोधा

Ranjitsingh
माढ्याच्या आमदारपुत्रासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा ! बार्शी न्यायालयाचे आदेश
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या चेअरमनने बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्याच्या नावावर परस्पर दोन लाखांचे कर्ज उचलल्याप्रकरणी आमदार पुत्रासह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी 9 एप्रिल रोजी बार्शी शहर पोलिसांना दिले आहेत.

आमदार पुत्र रणजितसिंह बबनराव शिंदे, तत्कालीन शाखाधिकारी, एक त्रयस्थ व्यक्ती यांच्यावर फसवणुकीचा, बनावट कागदपत्रे तयार करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पांडुरंग मधुकर थोरबोले (रा. काळेगाव, ता. बार्शी) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

महात्मा गांधी विद्यालय चोरढे (ता. मरूड, जि. रायगड) येथे शिक्षक असणारे पांडुरंग थोरबोले यांची काळेगाव येथे जमीन गट क्रमांक 284/1 असून त्यांनी बॅंक ऑफ इंडिया, शाखा पानगाव येथे जमीन गहाण - तारण ठेवून कर्ज काढले होते. बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचे सभासद होताना कारखान्यास आधार कार्ड, पॅनकार्ड, बॅंकेचे पासबुक आदी कागदपत्रांच्या झेरॉक्‍स प्रती देण्यात आल्या होत्या. या कागदपत्रांचा फायदा घेऊन रणजितसिंह शिंदे, शाखाधिकारी व एक व्यक्ती समक्ष उभा करून, संगनमत करून पूर्वीचे कर्ज थोरबोले यांच्या नावावर असताना बॅंक ऑफ इंडिया, शाखा बार्शी येथून थोरबोले यांच्या परस्पर त्यांच्या बनावट सह्या करून 28 डिसेंबर 2016 रोजी 2 लाखांचे कर्ज थोरबोले यांच्या नावावर घेतले.

बॅंक ऑफ इंडियाचे ऍड. श्रेयस मुळे यांची व्याजासह कर्ज वसुलीसाठी 5 सप्टेंबर 2019 रोजी 2 लाख 56 हजार 187 रुपये 74 पैसे भरण्याची नोटीस आली, तेव्हा परस्पर कर्ज काढल्याचे समजले.

याबाबत बॅंकेच्या बार्शी शाखेत माहिती घेऊन पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांच्याकडे फसवणुकीची तक्रार केली पण दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला, असे थोरबोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. थोरबोले यांच्या वतीने ऍड. आर. यू. वैद्य, ऍड. के. पी. राऊत, ऍड. श्रीमती पी. एस. शहा काम पाहात आहेत.