
भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खा. धनंजय महाडिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते.
मोहोळ - भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. आपण प्रयत्न करावा तुमचा शब्द माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी प्रमाण आहे. मात्र परिचारक यांनी दोन जागा मागितल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितले. मात्र त्यांचे स्वतःचे कारखाने असताना आमच्या कारखान्यावर त्यांची नजर का? म्हणून मी जागा देणार नसल्याचे ठासून सांगितले. दरम्यान संबंधिताशी विचार विनिमय करून मी दोन जागेचा शब्द ही माजी आमदार परिचारक त्यांना दिला. मला परिचारक यांचा सायंकाळी फोन आला माझी काही हरकत नाही, परंतु माजी आमदार राजन पाटील हे दहा जागा मागत आहेत, त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत असा फोन आला, त्यामुळे निवडणूक लढण्याचा आंम्ही निर्णय घेतल्याचा मोठा गौप्य स्फोट भिमाचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी केला.
टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यातील नेते मंडळींचा सन्मान व नूतन संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता त्यावेळी खा महाडिक बोलत होते.
खा. महाडिक पुढे म्हणाले, या सर्व गोष्टीचा उल्लेख मी निवडणुकीच्या कालावधीत मुद्दाम केला नाही, सभासदांनी एकतर्फी पुन्हा सत्ता आमच्या हातात दिल्याने आमची व सर्व संचालक मंडळाची जबाबदारी वाढली आहे. येत्या वर्ष भराच्या कालावधीत कारखान्यावर प्रतिदिन दीड लाख लिटर उत्पादन क्षमता असलेला इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून सभासदांना दिलेला शब्द खरा करणार असल्याचे खा महाडिक यांनी सांगितले.
या निवडणुकीत एकमेव तरुण चेहरा असलेले नूतन संचालक विश्वराज महाडिक हा अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील पदवी प्राप्त युवक आहे. तो भारतात येईल का नाही याचीच मला खात्री नव्हती, मात्र तो अमेरिकेतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याने त्यांने माझे निम्मे काम हलकी केले.
विरोधकांनी संस्थेसह सभासदांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास दिला. निवडणूक विनाकारण लादली, निवडणूक लढविण्याचा आमचा निर्धार झाल्यानंतर प्रचारात विरोधकांची प्रचाराची पातळी खालावली ती शेतकऱ्यांना रूचली नाही. तर आमची प्रचाराची पातळी वाढत गेली. आम्ही नवे व्हिजन घेऊन सभासदां समोर गेलो होतो. सध्या केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे, प्रचारा दरम्यान फिरताना या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे.
मी राज्यसभेचा खासदार असल्याने मी ५० ते १०० कोटीचा निधी देऊ शकतो. पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील नागरिकांना सर्व सुबत्ता देण्यासाठी मी बांधील असल्याचे खा महाडिक यांनी सांगितले. दरम्यान कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या सर्व नेते मंडळी सह आमचा आता "बारा बैलाचा औत झाला आहे" भविष्यात विकासाच्या मुद्द्यावर सर्व पक्ष भेद विसरून सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खा महाडिक यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील, माजी अध्यक्ष भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, सतीश काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, शंकर वाघमारे, संत शिरोमणी चे कल्याणराव काळे, सभापती विजयराज डोंगरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष चरण चवरे, मनसेचे प्रमुख दिलीप धोत्रे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दिनकर पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश शिवपुजे, शेतकरी संघटनेचे छगन पवार, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, भारत पाटील, पांडुरंग ताटे, शिवानंद पाटील, दिनकर कदम, धोंडीबा उन्हाळे, धनाजी घाडगे, काका गुंड, संजीव खिलारे, केशव चव्हाण, धोंडीबा उन्हाळे, दत्ता सावंत, रामराव भोसले आदीसह परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
पापरी, ता. मोहोळ येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर माळी यांनी निवडणुकी अगोदर झालेल्या विचार विनिमय सभेत जो पर्यंत भीमा परिवाराची सत्ता पुन्हा येत नाही, तो पर्यंत मी टोपी घालणार नाही असा नवस केला होता. मात्र भीमा परिवाराची पुन्हा सत्ता आल्याने खा. महाडिक यांच्या हस्ते त्यांच्या डोक्यावर पुन्हा सर्वासमक्ष टोपी घालण्यात आली.