दोन्ही माजी आमदारांनी मनावर घेतले तर निवडणूक बिनविरोध होण्यास फारसा वेळ लागणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima sugar factory election Prashat Parichark Dhanjay mahadik Rajan Patil unoppose election

दोन्ही माजी आमदारांनी मनावर घेतले तर निवडणूक बिनविरोध होण्यास फारसा वेळ लागणार नाही

मोहोळ - टाकळी सिकंदर मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांनी सुरुवाती पासूनच कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 18 जुलै पर्यंत आहे. या दोन्ही माजी आमदारांनी मनावर घेतले तर निवडणूक अजूनही बिनविरोध होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

खा. महाडिक हे गेल्या आठवड्या पासून त्यांच्या पुळुज येथील शेडवर ठिय्या मांडून आहेत. गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांनी विचार विनिमय सभा आयोजित करून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या, त्यावरून त्यांनी अंदाज घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खा. महाडिक यांनी कार्यकर्ते काही जुन्या संचालकांना अर्ज भरण्यास सांगितले. खा महाडिक यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे, तर खा. महाडिक हे सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात.

ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्याशी समक्ष चर्चा करून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगून, उमेदवारी अर्ज काढणे किंवा ठेवणे का गरजेचे आहे हे समजावून सांगत आहेत. या प्रक्रियेत उपाध्यक्ष सतीश जगताप व काही विश्वासू सहकाऱ्यांचा सहभाग आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान आहे, खा महाडिक हे त्या दिवशी दिल्लीला जाणार आहेत, त्यासाठी 18 तारखे अगोदरच नव्या व जुन्या संचालकांचा मेळ घालून 15 संचालकाची यादी अंतिम करण्याचे नियोजन सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या विचार विनिमय सभेत जुन्या जाणत्या व युवकांनी खासदार महाडिक यांचे चिरंजीव विश्वजीत महाडिक यांना चेअरमन करा अशी मागणी केली आहे. खा. महाडिक यांच्यावर राज्यसभेची जबाबदारी असल्याने पुढील काळात कारखान्याकडे त्यांचे लक्ष कमी असणार आहे. सध्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा खा. महाडिक यांनी माजी उपाध्यक्ष सतीश जगताप व चिरंजीव विश्वजीत यांच्या खांद्यावर दिली आहे.

वेगळा सवतासुभा

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कारखान्याचे माजी संचालक प्रभाकर देशमुख हे आपला वेगळा सावता सुभा मांडण्याच्या तयारीत आहेत. खा महाडिक यांनी देशमुख यांना डावलले तर त्यांना भीमा बचाव संघर्ष समिती जवळ करून खा महाडिक यांच्या विरोधात लढण्यासाठी देशमुखांच्या रूपाने समितीला आयती ढाल मिळणार आहे.

अपीलावर सुनावणी अपेक्षित

या निवडणूक प्रक्रियेत एकूण 175 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी विविध कारणे देत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी 47 अर्ज छाननीत नामंजूर केले आहेत. त्यापैकी सात जणांनी साखर सहसंचालक राजेंद्र दराडे यांच्याकडे अपील दाखल केले आहे, त्याचा निर्णय 14 कींवा 15 जुलै पर्यंत अपेक्षित आहे. कारखान्याच्या वतीने नामवंत अॅड. लुईस शहा यांनी तर अपील कर्त्याच्या बाजूने अॅड. उमेश मराठे, अॅड. श्रीरंग लाळे यांनी काम पाहिले.

विचार करून ठरवू

भीमा निवडणुकीच्या प्रक्रिये संदर्भात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याशी संवाद साधला असता निवडणूक जिंकू, पण कारखाना चालवणार कोण, तो चालविणे अवघड आहे मी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकणार नाही. कारखाना सुरू करावयाचा म्हणले तर लगेच 25 ते 30 कोटी रुपये ऍडव्हान्स वगैरे देण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे बघू चर्चा करून ठरवतो असे त्यांनी सांगितले.

Web Title: Bhima Sugar Factory Election Prashant Paricharak Dhanjay Mahadik Rajan Patil Unoppose Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top