अरे व्वा ! करमाळा तालुक्‍यात उभारणार जैविक इंधन निर्मिती प्रकल्प 

biofuels
biofuels

पांडे (सोलापूर) : माजी राष्ट्रपती (कै.) ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची संकल्पना असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करमाळा तालुक्‍यात सुमारे 50 कोटी रुपयांचा जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प (नैसर्गिक गॅस निर्मिती) उभा केला जाणार आहे. 

या प्रकल्पामुळे करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे आर्थिक हित साध्य होणार असून, संपूर्ण करमाळा तालुका प्रदूषणमुक्त करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबरोबरच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. नैसर्गिक गॅस निर्मिती प्रकल्पाच्या हिसरे येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये अभिनव पृथ्वी केअर प्रायव्हेट लिमिटेड व करमाळा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत हिसरे येथे गाव प्रोजेक्‍टबद्दल प्रमुख देविदास वाघमोडे यांनी सभासदांना मिळणारे फायदे याविषयी माहिती दिली. 

सध्या देशाचा वीस टक्के खर्च हा बाहेरील देशातील इंधन आयात करण्यासाठी होत आहे. माजी राष्ट्रपती (कै.) ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्याच देशात नैसर्गिकरीत्या इंधन तयार करण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाची संकल्पना पुढे आणली. त्या माध्यमातून जैविक इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू होत आहेत. तसाच प्रकल्प सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्‍यात होत असून, हा पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताबरोबरच सामाजिक कार्य व पर्यावरण या तीन गोष्टींवर भर दिला जाणार आहे. 

या प्रकल्पासाठी किंवा इंधन निर्मितीसाठी दगड, लोखंड व काच सोडल्यास शेतकऱ्याच्या शेतात जो कचरा किंवा गवताचे उत्पादन होईल त्याचा उपयोग होणार आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे जो जमा होणारा कचरा आहे त्याचाही उपयोग या प्रकल्पासाठी होणार आहे. या प्रकल्पासाठी प्रामुख्याने जे गवत लागणार आहे, ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मिळणार आहे. त्यामुळे गजराज / गिनीगोल नावाचे गवत शेतकऱ्यांना लावण्यासाठी देऊन वर्षभरातून या गवताच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका एकराला सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च वजा जाता उत्पन्न देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल त्यांच्या शेतात जाऊन खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना कोठेही गवत घेऊन जाण्याची गरज नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे. दरम्यान, या प्रकल्पातून निर्माण होणारे इंधन हे वाहनांसाठी व घरगुती स्वयंपाकासाठी लागणारे इंधन यासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना केवळ 500 रुपयांमध्ये सभासद करून घेऊन त्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या एकूण नफ्यातील सुमारे वीस टक्के नफा हा सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून दर्जात्मक शिक्षणाची उभारणी, चांगल्या आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून त्यांच्यासाठी स्वस्त दरातील सुसज्ज असे रुग्णालय निर्मिती यावर भर असणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या माध्यमातून काम केले जाणार आहे. इंधनासाठी लागणारे गिनीगोल गवत शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये टन याप्रमाणे विकत घेतले जाणार आहे. 

तसेच शेतकऱ्याकडील भुस्सा, टाकावू मटेरिअलही घेतले जाणार आहे. यापासून नैसर्गिक गॅस (जैविक इंधन) निर्मितीसाठी शेतकरी जे उत्पादित करेल ते उत्पादन घेतले जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडे जमा होणारा सगळा कचराही घेतला जाणार आहे. त्यामुळे स्वच्छ ग्राम ही संकल्पनाही राबवली जाणार आहे. म्हणून करमाळा तालुका प्रदूषणमुक्त कसा होईल, हे ही पाहिले जाणार आहे. करमाळा तालुक्‍याला इंधन क्षेत्रात स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

या वेळी देविदास वाघमोडे, जामखेड येथील अजिंक्‍य लेकुरवाळे, अभिजीत जगदाळे, सदाशिव जगदाळे, मंगेश मुरुमकर व महिला बचत गट ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com