‘ई-मेल’वर ३ ते ७ दिवसांत मिळणार जन्म-मृत्यूचा दाखला! ‘हे’ कागदपत्रे लागतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur mahapalika
‘ई-मेल’वर ३ ते ७ दिवसांत मिळणार जन्म-मृत्यूचा दाखला! ‘हे’ कागदपत्रे लागतील

‘ई-मेल’वर ३ ते ७ दिवसांत मिळणार जन्म-मृत्यूचा दाखला! ‘हे’ कागदपत्रे लागतील

सोलापूर : जन्म व मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आता महापालिकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. दवाखान्यातील जन्म किंवा मृत्यूसंबंधीचा अर्ज महापालिकेच्या solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर केल्यानंतर तीन ते सात दिवसांत दाखला संबंधिताच्या ई-मेलवर पाठविण्याची सोय महापालिकेने केली आहे. परंतु, त्यासाठी मुदतीत संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक आहे.

दरमहा जन्म-मृत्यू दाखल्यासाठी दीडशेहून अधिक ऑनलाइन अर्ज महापालिकेला प्राप्त होतात. हे सर्व अर्ज सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिमला (सीआरएस) जोडून संबंधित अर्जदाराची कागदपत्रे पडताळली जातात. जन्म दाखल्यासाठी एक नंबरचा अर्ज आणि आई-वडिलाचे आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र आवश्यक असते. नावात दुरुस्ती असल्यास त्यासंबंधीचे पुरावे अर्जासोबत अपलोड करावे लागतात. मूल जन्मल्यानंतर २१ दिवसांत त्यासंबंधीचा अर्ज करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, मृत्यू दाखल्यासाठी मृताचे आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र आणि रुग्णालयात मृत्यू झाल्यास तेथील फॉर्म आणि घरी मृत्यू झाल्यास त्यांच्या फॅमिली फिजिशियनकडील ४-अ हा अर्ज भरून द्यावा लागतो. मृत्यू दाखल्यासाठी दोन नंबरचा फॉर्मदेखील भरून द्यावा लागतो. नावात कोणताही बदल नसेल आणि कागदपत्रे पुरेशी असल्यास तीन ते सात दिवसांत दाखला मिळतो, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली. परंतु, काहीजणांच्या तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत. त्यासाठी अपुरी कागदपत्रे किंवा नाव, तारखेतील बदल ही कारणे असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. तरीपण, जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी विलंब होऊ नये, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

जन्म दाखल्यासाठी विलंब नकोच

कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन महापालिकेत अर्ज करणे किंवा विभागीय कार्यालयात हेलपाटे मारून जन्म-मृत्यूचा दाखला घेणे आता बंद झाले आहे. महापालिकेने ही प्रक्रिया आता पूर्णत: ऑनलाइन केली आहे. मूल जन्मल्यानंतर २१ दिवसांत महापालिकेकडे दाखल्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. २१ दिवस ते एक वर्षाच्या कालावधीपर्यंत महापालिका दंड भरून संबंधिताला दाखला देऊ शकते. पण, वर्षाहून अधिक काळ लोटल्यास नोंद नसल्याचा दाखला उपनिबंधक (जन्म-मृत्यू कार्यालय) कार्यालयातून घेऊन म्युनिसिपल कोर्टातून परवानगी आणावी लागते. त्याशिवाय दाखला दिला जात नाही. १५वर्षांनी पण नाव नोंदवता येते, पण त्यासाठी जन्म दाखल्याची मूळप्रत, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, आधारकार्ड ही कागदपत्रे लागतात.

‘ही’ कागदपत्रे लागतील

  • जन्म दाखला : जनन वार्ता फॉर्म, आई-वडिलांचे आधारकार्ड, माहिती देणाऱ्यांचे आधारकार्ड, बाळ जन्माचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

  • मृत्यू दाखला : अर्जदाराचे आधारकार्ड, मयताचे आधारकार्ड, दफन केल्याची पावती, वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना ४-ए.