उ.सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आज ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह अनेक कॉँग्रेस नेत्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच आपण या निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्याचा दावा आमदार कल्याणशेट्टी यांनी केला, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे.