
सोलापूर : सोलापूर बाजार समितीचा कारभारी कोण?, हे ठरविणाऱ्या मतदारभावाचा (भाऊमधील भाव) नारळ अखेर फुटल्याचे समजते. कागदावर दिसणारे मतांचे बळ सुखरुप ठेवण्यासाठी शेवटी शेवटी कपबशीही तापल्याची चर्चा आहे. कोट्यावधीची उलाढाल असलेल्या संस्थेचे कारभारी ठरविणाऱ्या मतदार राजाला मात्र दहा-वीस हजारात गुंडाळल्याचे समजते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उद्या (रविवार, ता. २७) खास सोयही केल्याचे समजते. परंतु, प्रचारात कुठेही शेतकरी हिताचे मुद्दे चर्चेला आले नाहीत. दोन्ही पॅनलनी शेतकरी हितासाठी काय करणार याबद्दल चकार शब्द काढला नाही.