

सोलापूर : शहरात सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत दोघे एकमेकांसमोर आले. त्यातील उत्तम प्रकाश सरवदे (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) याला २०१९ मध्ये भावाचा खून झालेले आठवले. या गुन्ह्यात एक वर्ष तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आलेल्या तुकाराम ऊर्फ रॉबट पांडुरंग सरवदे यानेच तो खून केल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी उत्तम सरवदे याने तुकारामला धरून जोरात जमिनीवर आपटले. त्याच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन तुकाराम सरवदे याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी संशयिताला एका तासातच शोधले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी ठोठावली आहे.