esakal | बळिराजाचा रथ होतोय दुर्मिळ ! गावगाड्यातील पारंपरिक साधने इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
sakal

बोलून बातमी शोधा

Bullock Kart

माणसांची जीवनशैली बदलली... तशी त्याची वापराची साधनेही बदलली आहेत. शहरांपासून गाव- खेड्यांपर्यंत आता वाहनांचा प्रचंड गोंगाट वाढला आहे. या गोंगाटामध्ये बळिराजाचा रथ म्हणून ओळख असलेली बैलगाडी मात्र दुर्मिळ होत चालली आहे. केवळ बैलगाडीच नव्हे तर खेड्यातील अनेक पारंपरिक साधने आता इतिहासजमा होत आहेत.

बळिराजाचा रथ होतोय दुर्मिळ ! गावगाड्यातील पारंपरिक साधने इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

sakal_logo
By
कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : माणसांची जीवनशैली बदलली... तशी त्याची वापराची साधनेही बदलली आहेत. शहरांपासून गाव- खेड्यांपर्यंत आता वाहनांचा प्रचंड गोंगाट वाढला आहे. या गोंगाटामध्ये बळिराजाचा रथ म्हणून ओळख असलेली बैलगाडी मात्र दुर्मिळ होत चालली आहे. केवळ बैलगाडीच नव्हे तर खेड्यातील अनेक पारंपरिक साधने आता इतिहासजमा होत आहेत. 

माणसाचे जीवनमान बदलले जात आहे. मात्र, हे किती आणि कसे बदलले याची प्रचिती आज खेड्यापाड्यांतही पाहायला मिळते आहे. पूर्वी शेतकऱ्यांची श्रीमंती त्याचा बैल व बैलगाडीवरून दिसून यायची. त्या बैलगाड्यांची संख्याच आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र शहरापासून ते खेडोपाड्यांपर्यंत दिसू लागले आहे. 

पूर्वी बार्शी तालुक्‍यामध्ये गाव व खेडोपाड्यांतील उत्सव, जत्रा, लग्न-समारंभ, माहेरवाशिणीची ने-आण करण्यासाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. शेतकऱ्यांना शेतीच्या प्रत्येक कामात तसेच सामान वाहण्यासाठी बैलगाडीचा आधार असायचा. गावात एखाद्याकडे सायकल असली तरी तो पाटील. मोटारसायकल असली असली तर पुढारी. चारचाकी असेल तर गावचा जमीनदार. परंतु, ज्याच्याकडे बैलगाडी असेल तो श्रीमंत म्हणून समजला जायचा. आज मात्र या सगळ्या उपाध्या फोल ठरत आहेत. 

सर्जा-राजाची तटांनी सजलेली व घुंगरांचा आवाज करीत डौलाने धावणारी जोडी... मामाचे गाव..., मातीचा रस्ता... चाकांची खडखड... मुलांचा जल्लोष... त्यावर धावणारी प्रदूषणरहित बैलगाडी... आज पडद्याआड होत असल्याचे दु:ख गावातील जुन्या जाणकारांना होत आहे. ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन व पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेचा एक भाग असलेली ही बैलगाडी आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. शेत शिवारासह नागमोडी वाट, वळणाचा चढ-उताराचा रस्ता असो की सपाट-सखल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता दुर्मिळ झाले आहे. 

पूर्वी बैलगाडीतूनच वधू-वरांची ने-आण होत असे. शिवाय नवरदेवाची वरात तसेच देवदेवतांची मिरवणूक काढली जात असे. लाकडाची सुबक, दणकट कलाकुसर करून बैलगाडी बनविण्याचे काम सुतार बांधव करत. या बैलगाडीला लागणारी चाके ही तूब, सागाच्या लाकडापासून बनविली जात. ही तूब काढण्यासाठी आतासारखे यंत्र नव्हते. ती हाताच्या कलाकुसरीने तयार केली जात असे. बैलगाडी बनविण्यासाठी सुमारे 10 ते 15 हजार रुपयांच्या आसपास खर्च होत असे. बार्शी तालुक्‍यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या बैलगाड्या आज शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीला बैलगाडी केवळ पुस्तकात बघायला मिळेल, असेच काहीसे आजचे चित्र आहे. 

अन्‌ बैलगाडीची गरज कमी झाली 
विजेवर चालणारे मशिन आल्यामुळे लाकडी बैलगाडीची जागा लोखंडी बैलगाडीने घेतली. तसेच आता दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेतकऱ्यांकडे दुचाकी, ट्रॅक्‍टर, रिक्षा, टेम्पो व इतर मालवाहतूक साधने आली. वाहनांच्या मदतीने जलद वाहतूक होऊ लागल्याने वेळेची बचत झाली. शेतमाल ट्रॅक्‍टर, रिक्षा, टेम्पोने बाजारात जाऊ लागल्याने बैलगाडीची गरज कमी झाली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top