महापालिकेवर २९३ कोटींचा बोजा | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation
महापालिकेवर २९३ कोटींचा बोजा

सोलापूर : महापालिकेवर २९३ कोटींचा बोजा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरवासियांचे प्रश्‍न सुटतील, त्यांना मुबलक प्रमाणात मुलभूत सोयी-सुविधा मिळतील असा विश्‍वास होता. मात्र, महापालिकेची देणी वाढली आणि कर्जही फेडता आले नाही. सद्यस्थितीत भांडवली निधीतून कामे केलेल्या मक्‍तेदारांचे जवळपास ७० कोटी रुपये, सेवकांचा महागाई भत्ता, पाचवा व सहाव्या वेतन आयोगाचा फरक, फंड, ग्रॅच्युटी, शिल्लक रजेचे पैसे असे एकूण १७४ कोटी आणि सोलापूर ते उजनी या जुन्या पाइपलाइनसाठी काढलेल्या ४९ कोटी रुपयांचा बोजा अजूनही तसाच आहे.
महापालिकेने २०२१-२२ मध्ये विविध प्रकारच्या करातून ३३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे टार्गेट ठेवले. मात्र, एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत केवळ ८५ कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. मागील पाच-सहा वर्षांत एकदाही ठरविल्याप्रमाणे महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा झालेले नाही. मक्‍तेदारांना केलेल्या कामाचे पैसे दोन वर्षांनी मिळतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे बरेच मक्‍तेदार महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांपेक्षा शासनाच्या निधीतून होणाऱ्या कामांनाच पसंती देतात ही वस्तूस्थिती आहे. भांडवली निधीतून कामे करण्यास मान्यता मिळाली, परंतु तिजोरीत पैसाच नाही, अशी आवस्था झाली आहे. महापालिकेचा सर्व प्रकारचा दरवर्षीचा खर्च जवळपास ३०० कोटींहून अधिक आहे. परंतु, उत्पन्न २०० कोटींपर्यंतच मिळत असल्याने शहरातील विकासकामे खोळंबली आहेत. ही परिस्थिती बदलून शहर खरोखरच ‘स्मार्ट’ होण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी ठोस पाऊल उचलून उत्पन्न वाढीवर मार्ग शोधायला हवा. वरिष्ठ अधिकारी हे तीन वर्षांपर्यंतच, परंतु सत्ताधारी, विरोधकांनी उत्पन्न वाढीसाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.

मेन्टेनन्सचा खर्च थेट महापालिकेला मिळणार
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगभवन प्लाझा, ॲडव्हेंचर पार्क, पार्क स्टेडिअम, होम मैदान, स्ट्रीट बझार अशी विविध कामे झाली आहेत. त्यातील बरीच कामे महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. मात्र, स्मार्ट सिटीकडून त्याची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. त्यामध्ये मोठा गैरव्यहार होऊ शकतो, अशी तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. त्यानुसार आता पुढील काळात त्या कामांच्या देखभाल-दुरुस्तीचा निधी आता स्मार्ट सिटीला नव्हे तर थेट महापालिकेला मिळणार आहे. त्यासंदर्भात आम्ही मागणी केली होती, अशी माहिती महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिली.
महापालिकेकडील बाहेरील देणी कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु आहे. उत्पन्न वाढीसाठी सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण, नळ कनेक्‍शनचा सर्व्हे केला जाणार आहे. शहरातील विकासकामे वेळोवेळी होण्यासाठी उत्पन्न वाढायला हवे.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर

loading image
go to top