esakal | झरे ग्रामपंचायतीवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष

बोलून बातमी शोधा

CCTV camera in Zare village in Solapur district

गावातील महिलांची सुरक्षितता आणि चोऱ्या थांबविण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हीची अत्यंत गरज असल्याने आम्ही निर्णय घेतला. गावातील विकास, नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा कशा उपलब्ध होतील यावर आम्ही भर देत आहोत. गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याकरिता चांगली सोय केली आहे. लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- सुनीता पाटील, सरपंच, झरे 

झरे ग्रामपंचायतीवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष
sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : राज्यभरात महिलांवर अत्याचार वाढत असून चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. हे सर्व पाहता करमाळा तालुक्‍यातील साडेतीन हजार लोकसंख्येच्या झरे ग्रामपंचायतने ठराव करून 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आहे. गावावर तिसऱ्या डोळ्याची नजर असल्याने गावाकऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे. 
टेंभुर्णी- नगर महामार्गावर जेऊरपासून सहा किलोमीटर येथे झरे फाटा असून तेथून पुढे गाव आहे. सोलापूरकडून येणारी अनेक वाहने जवळचा मार्ग म्हणून राशीन, कर्जतकडे येथूनच जातात. याशिवाय साखर कारखान्यांकडे गावातून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच सुनीता पाटील यांच्या संकल्पनेतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. याला ग्रामपंचायत सदस्यांनी तत्काळ मान्यता दिली. तालुक्‍यातील अन्य ग्रामपंचायतच्या तुलनेत त्यांनी एक पाऊल पुढे टाकत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 12 ठिकाणी सीसीटीव्ही असलेली तालुक्‍यातील ही पहिली ग्रामपंचायत असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. 
गावात एक हजार 600 महिला आहेत. गावात शाळा व महाविद्यालय असल्याने अन्य गावचे विद्यार्थी येथे शिक्षणाकरिता येतात. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून गावाच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतचा निर्णय महत्त्वाचा आहे. 
 

येथे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे 
गावाची वेस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठ्याची ठिकाणे, ज्योतिर्लिंग मंदिर, हायमास्ट दिवे अशा 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात आहे. 

गावातील महिलांची सुरक्षितता आणि चोऱ्या थांबविण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हीची अत्यंत गरज असल्याने आम्ही निर्णय घेतला. गावातील विकास, नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा कशा उपलब्ध होतील यावर आम्ही भर देत आहोत. गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याकरिता चांगली सोय केली आहे. लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- सुनीता पाटील, सरपंच, झरे 

झरे ग्रामपंचायतमार्फत गावातील विकासासाठी सर्वजण एक पाऊल पुढे टाकत आहोत. आम्ही लवकरच ग्रामपंचायत डिजिटल करत आहोत. लोकांनी विकासासाठी ग्रामपंचायत कर वेळेत भरणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक गावातील नोकरदारांच्या पगारातून मार्च अखेर ग्रामपंचायत कर वसूल करण्याची व्यवस्था शासनाने केल्यास ग्रामपंचायत अधिक समृद्ध होईल. 
- जी. आर. कळसाईत, ग्रामविस्तार अधिकारी 

झरे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक ऍक्‍टिव्ह आहेत. गावात सीसीटीव्ही कॅमेराद्वारे गावच्या सरंक्षणाचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यात अन्य ग्रामपंचायतींनी हा उपक्रम राबवावा. 
- श्रीकांत खरात, गटविकास अधिकारी, करमाळा