Pandharpur News : जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता

चैत्री एकादशीला चंद्रभागेत स्नान व श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतल्यानंतर शनिवारी (ता.२०) द्वादशीच्या दिवशी भाविकांनी जड अंतकरणाने पंढरीचा निरोप घेतला.
chaitra ekadashi vitthal rukmini darshan
chaitra ekadashi vitthal rukmini darshanSakal

पंढरपूर : चैत्री एकादशीला चंद्रभागेत स्नान व श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतल्यानंतर शनिवारी (ता.२०) द्वादशीच्या दिवशी भाविकांनी जड अंतकरणाने पंढरीचा निरोप घेतला. 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता अशी भावना व्यक्त करत भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी येथील बस स्थानकावर गर्दी केली होती.

चैत्री एकादशीचा मुख्य सोहळा यंदा रविवारी (ता.१९) पार पडला. यावर्षी चैत्री यात्रेदरम्यान श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असल्याने यात्रेला आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले. तदनंतर भाविक द्वादशीलाच परतीच्या प्रवासाला निघाले.

आपापल्या गावी जाण्यापूर्वी भाविकांनी श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रासादिक वस्तूंच्या दुकानातून चुरमुरे, बत्तासे, सुगंधी अगरबत्ती, हळद कुंकू, बुक्का व विभूती, तुळशी माळा, देवी देवतांचे फोटो आदी प्रासादिक साहित्य खरेदी केले.

चैत्री यात्रेच्या निमित्ताने प्रसादिक साहित्याच्या बाजारपेठेत चांगली उलाढाल झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत 'सकाळ 'शी बोलताना ताठे अगरबत्तीचे उत्पादक सागर ताठे-देशमुख म्हणाले,

मागील एक महिन्यापासून श्री विठ्ठल मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू असल्यामुळे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पदस्पर्श दर्शन बंधन असल्याने भाविकांची संख्या कमालीची घटली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावरही झाला आहे.

मात्र चैत्री एकादशी व द्वादशीला भाविकांनी प्रासादिक साहित्य खरेदीस प्राधान्य दिल्याने चांगला व्यवसाय झाला. दरम्यान परतीच्या प्रवासासाठी भाविकांनी येथील नवीन बस स्थानकावर तुडुंब गर्दी केली होती. द्वादशीच्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच बस स्थानक भाविकांच्या गर्दीने भरून गेले होते.

पंढरपूर बस आगारामधून चैत्री यात्रा व शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी जादा बस गाड्या सोडल्या होत्या. याबाबत पंढरपूर बस स्थानक प्रमुख पंकज तोंडे म्हणाले, यंदा शिखर शिंगणापूर व चैत्री यात्रेला आलेला भाविकांची पंढरपूर बस स्थानकामध्ये प्रचंड गर्दी आहे.

या भाविकांसाठी ७५ जादा बस गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. भाविकांना बसस्थानकामध्ये जास्त काळ प्रतीक्षा करावी लागू नये याकरिता या जादा बस गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

चैत्री यात्रेला आलेल्या भाविकांमध्ये सांगली, कोल्हापूर, बेळगाव भागातील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने १०० जादा बस गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती कोल्हापूर येथील सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.

श्री.पाटील व त्यांचे सहकारी पंढरपूर बस स्थानकात समक्ष हजर राहून कोल्हापूर सांगली कडे जाणाऱ्या भाविकांची ज्यादा बस गाड्यांमध्ये बसण्याची सोय करताना दिसून आले. या सुविधेबाबत भाविक उत्तम एकनाथ ढेरे (रा.कुर्डू, ता.करवीर,जि.कोल्हापूर) म्हणाले, मागील वर्षी चैत्री यात्रा झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी पंढरीतील बस स्थानकामध्ये तासनतास प्रतीक्षा करावी लागली होती. यंदा मात्र महामंडळाने उत्तम नियोजन केल्यामुळे लगेचच बस मिळाली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com