Pandharpur : राज्यभरातील सुमारे दोन लाख भाविकांनी अनुभवला चैत्री एकादशीचा सोहळा

चैत्री एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते.
chaitri ekadashi event celebration in pandharpur
chaitri ekadashi event celebration in pandharpursakal

पंढरपूर - चैत्री एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. एकादशीच्या दिवशी शुक्रवारी (ता. १९) लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी साधली. श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग आज एक नंबरच्या पत्रा शेडमध्ये गेली होती. श्रींच्या मुखदर्शनासाठी सुमारे तीन तास लागत होते. दरम्यान चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा श्री विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते तर श्री रूक्मिणीमातेची नित्यपुजा ह. भ. प. श्री. प्रकाश जवंजाळ यांच्या हस्ते करण्यात आली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या जतन व संवर्धनाचे काम सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असून केवळ मुखदर्शन सुरू आहे. पदस्पर्श दर्शन बंद असल्याने चैत्री दशमी दिवशी मंदिर परिसरामध्ये भाविकांची तुरळक गर्दी होती तर पत्रा शेड दर्शन रांगेमध्ये पूर्ण शुकशुकाट होता. मात्र शुक्रवारी एकादशीच्या दिवशी राज्यभरातून सुमारे दीड लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते.

सध्या चंद्रभागा नदीच्या पात्रात मुबलक पाणी साठा असल्याने बहुतांश भाविकांनी नदीमध्ये एकादशीचे पवित्र स्नान केले. तदनंतर भाविक श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी दर्शन रांगे कडे जाताना दिसून आले. दर्शनाची रांग आज एक नंबर पत्रा शेडमध्ये गेली होती. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने आज साबुदाणा खिचडी व शुद्ध पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

कडाक्याच्या उन्हापासून भाविकांना संरक्षण मिळावे याकरिता दर्शन रांगेवर कापडाचे आच्छादन करण्यात आले होते. दरम्यान एकादशी दिवशी श्री विठ्ठल मंदिरातून मुखदर्शन घेऊन बाहेर आलेले भाविक रामेश्वर गंगाराम गडलिंग (रा. पोखरी, ता. जालना, जि. जालना) 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, आज सकाळी सहा वाजता एक नंबरच्या पत्रा शेड दर्शन रांगेमध्ये उभा होतो.

तीन तासानंतर सकाळी नऊ वाजता श्री विठ्ठलाचे मुखदर्शन प्राप्त झाले. यंदा चैत्री एकादशीला पदस्पर्श दर्शन घेता आले नसले तरी पांडुरंगाच्या कृपेने मुखदर्शन प्राप्त झाले यातच समाधान मानले. दरम्यान चैत्री यात्रा कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले व त्यांचे सहकारी महाद्वार घाटावरील गर्दीचे नियंत्रण करताना दिसून आले. भाविकांना नदीच्या वाळवंटामध्ये वावरताना अडथळा होऊ नये यासाठी तेथील स्टॉल धारकांचे अतिक्रमण हटवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com