esakal | बदलत्या हवामानाचा होतोय शेतीवर विपरीत परिणाम ! काय आहे सद्य:स्थिती?

बोलून बातमी शोधा

Climate

बदलत्या हवामानाचा होतोय शेतीवर विपरीत परिणाम ! काय आहे सद्य:स्थिती?

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते आणि परिसरात काल सकाळी दहा वाजल्यापासूनच तापमानात आणि आर्द्रतामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तापमान 40 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 80 पर्यंत गेलेली होती. या बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकांचे आणि डाळिंबाचे फार मोठे नुकसान होणार आहे. वादळी वारे झाले तर केळी पिकाची मोठी पडझड होणार आहे. आणि अवकाळी पावसामुळे आंबा पिकात अळी होणार आहेत आणि काढणीस आलेल्या आंब्याचे फार मोठे नुकसान होणार आहे.

आभाळ आल्यामुळे डाळिंब फळावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणार आहे. मागील दोन वर्षांपासून डाळिंब उत्पादक रोगराईमुळे आणि बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्यामुळे रडकुंडीला आलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे व बदलत्या हवामानाचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन 15 मे पर्यंत वाढविलेला आहे. त्यामुळे शेतीमालाला कसलाही बाजारभाव मिळत नाही. शेतातील भाजीपाला कवडीमोल किमतीने व्यापारी विकत घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या घरी मनुष्यबळ आहे, असे शेतकरी ट्रॅक्‍टर- ट्रॉलीमधून किंवा चारचाकी गाडीतून आंबा पीक, कलिंगड आणि इतर भाजीपाला नातेपुतेच्या बाजारपेठेत आणून थेट विक्री करत आहेत.

हेही वाचा: राज्यातल्या लसीकरणाला लागणार ब्रेक; कशी आहे परिस्थिती?

अतिशय कमी किमतीत कलिंगड मिळत असल्यानेही ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून येते. मध्यम आकाराचे कलिंगड ते दरवर्षी 20 ते 25 रुपयांना विक्री होत होते. लॉकडाउनमुळे फक्त पाच रुपयाला ग्राहकांना कलिंगड मिळत आहे. मात्र ढासळत्या दरामुळे दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारीच होत आहेत.

दरवर्षी या काळात आर्द्रता 30 ते 40 असते, परंतु आता 70 ते 80 पर्यंत गेलेली आहे. यामुळे फळबागांवर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढणार आहे .

- राहुल जठार, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त डाळिंब उत्पादक शेतकरी, नातेपुते