esakal | लसीकरणाविना परतताहेत नागरिक ! लस उपलब्ध नसल्याने आज आणि उद्या नाही लसीकरण

बोलून बातमी शोधा

Vaccination

लसीकरणाविना परतताहेत नागरिक ! लस उपलब्ध नसल्याने आज आणि उद्या नाही लसीकरण

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा असल्याने, कमी- अधिक प्रमाणात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत आहेत. त्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचा कोरोनावरील लसीकरणाकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला असून, आरोग्य केंद्रांच्या समोर रांगाच्या रांगा लावल्या जात आहेत. मात्र लसच उपलब्ध न झाल्याने आज (मंगळवारी) व उद्या (बुधवारी) लसीकरण होणार नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज कदम यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

सुरवातीला नागरिकांचा लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु जसे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तसे लसीकरणासाठी नागरिक स्वतःहून आरोग्य केंद्रांकडे येऊ लागले आहेत. परिणामी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उपस्थितांना रांगेत उभे राहून लस घ्यावी लागली. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसह वयोवृद्ध व्यक्तींचाही समावेश होता. तरीदेखील काही नागरिकांना लस मिळाली नाही. मर्यादित स्वरूपात लस आरोग्य केंद्रात उपलब्ध होत असल्याने काहींना विनालसीकरण परतावे लागले. मात्र लसीचा तुटवडा इतका आहे, की लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी व बुधवारी लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: राज्यात होणार आठ दिवसांचा कडक लॉकडाउन ! जाणून घ्या नेमके कारण

सर्वांना लस कशी मिळेल यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. परंतु सध्या राज्यात लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने नाइलाजाने सकाळी सुरू केलेले लसीकरण दुपारपर्यंतच सुरू राहात आहे. लसीचा मुबलक पुरवठा झाल्यास गावोगावी शिबिर घेऊन लसीकरण करता येईल.

- डॉ धनराज कदम, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपळाई बुद्रूक

लसीकरणासाठी शासनाच्या वतीने ऑनलाइन नोंदणी सुरू केले आहे. त्यानुसार लसीकरण मोहीम राबविल्यास आरोग्य केंद्रांवर गर्दी होणार नाही. नागरिकांची धावपळ होणार नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

- विश्वेश्वर जमदाडे, नागरिक