

- विक्रम पाठक
सोलापूर : वेद, शास्त्र, पुराण, रामायण, महाभारत, कविता, गाथा, मंत्रसंहिता, आयुर्वेद उपचार, शकूनवंती अशा अनेक प्रकारच्या हस्तलिखित ग्रंथांचे संग्रहालय उभारले आहे जुने विठ्ठल मंदिराशेजारच्या जोशी गल्लीतील किरण जोशी यांनी.
मिळेल तेथून ग्रंथ जमा करून त्यांचे जतन करण्याचा त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी जडलेला छंद आता मोठ्या रूपात मानवतेच्या कल्याणाचे कार्य करत आहे. माँ भारती ग्रंथ मंदिर असे ग्रंथालयाचे नाव आहे.
आपल्या धार्मिक परंपरा या मौखिक आणि ग्रंथ रूपात पुढे सरकत राहिल्या. पिढ्यानपिढ्या आईवडिलांकडून झालेले संस्कार आणि परंपरा आजतागायत सुरू आहेत. तसेच शेकडो वर्षांपूर्वीपासून ग्रंथांची निर्मिती होत गेली व त्या ग्रंथांच्या माध्यमातूनही धर्म, चालीरिती परंपरा, संस्कार पुढच्या पिढीमध्ये आले.
ग्रंथ हे मानवतेच्या कल्याणाचे कार्य करतात. जगण्याची ऊर्जा देतात. किरण जोशी यांना १९८८ पासून म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षीपासून ग्रंथ जमा करण्याचा छंद लागला. तेव्हापासून आतापर्यंत दीड हजार हस्तलिखित व २५०० हून अधिक छापील ग्रंथ त्यांनी जमा केले. सुरवातीला काही ग्रंथ जमा केल्यानंतर त्यांना जतन कसे करायचे याची त्यांना माहिती नव्हती.
त्यांना ग्रंथ संरक्षण तज्ज्ञ अनिता दत्तात्रय जोशी यांनी माहिती दिली. त्यानंतर रसायनविरहित पुठ्ठे, सुती कापड, आणि अतिदुर्मिळ खूपच जुनी ग्रंथसंपदा जतन करण्यासाठी त्यांनी सापाच्या कातणीचाही वापर केला. विशेष म्हणजे हे सर्व करताना कोणाकडूनही कसलीही मदत घेतली नाही.
ही आहेत ग्रंथांची वैशिष्ट्ये
अडीचशे वर्षांपूर्वीचा एक तुळजाभवानीचे महात्म्य सांगणारा ग्रंथ असून तो दिव्याच्या काजळीने लिहिलेला आहे. त्याची अक्षरे आजही जशाच तशी आहेत. अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्कृत आणि हिंदी भाषेतील आयुर्वेदाचे महत्त्व आणि उपचार सांगणाराही ग्रंथ आहे.
त्यात औषधांचे प्रमाण किती असावे याचाही उल्लेख आढळतो. ग्रंथ आणि तत्कालीन पत्रांच्या कागदांची गुणवत्ताही अप्रतिम असल्याचे दिसते. म्हणजे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीही उत्तम कागद आपल्याकडे तयार केला जात होता याचाच हा पुरावा म्हणावा लागेल.
मुंबई विद्यापीठाला आकर्षण
मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थीही संदर्भासाठी संग्रहालयाला भेट देतात. ज्यांना हवे त्यांना प्रिंट काढून घेता येते. संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनीही या संग्रहालयाला भेट दिली. २७५ वर्षांपूर्वीची हस्तलिखित भगवत् गीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भेट दिली. तेव्हा मोदीनींही संग्रहालयाचे कौतुक केले. कोरोना काळापासून ग्रंथालयाला भेटी देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण ते पुन्हा वाढेल अशी खात्री जोशी यांना आहे.
ग्रंथांचे स्कॅनिंग पूर्ण
ग्रंथालयात असलेल्या चार हजारपैकी दीड हजार ग्रंथांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. ग्रंथांचे संरक्षण करणे हे काही सोपे काम नाही. ते खर्चिक तर आहेच शिवाय वाळवी लागू नये म्हणून ती हस्त नक्षत्रात उन्हात वाळवणे, पाहणे झाले की व्यवस्थित बांधून ठेवण्याची काळजी ते घेतात. आता ते डिजिटल स्वरूपातही उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे.
ग्रंथ जमा करून संग्रहालय उभारल्याचा आनंद मोठा आहे. आजची पिढी कोणत्याही गोष्टीला पुरावा मागते. तो पुरावा आपल्याकडे मिळतो. ते ग्रंथ कधीचे आहेत त्याचाही उल्लेख त्यातच असल्याने तसेच बहुतांश मोडीलिपी, संस्कृत भाषेत आहेत. त्यांचा अभ्यास केल्यानंतर आपले पूर्वज आपल्यापेक्षा कैक पटींनी ज्ञानी होते हे सहज लक्षात येते. आणि हा ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोचवतो याचे समाधान वाटते.
- किरण जोशी, ग्रंथ संग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.