गळोरगी येथे देश-विदेशातील रंगीबेरंगी पक्ष्यांची मांदियाळी ! भविष्यात होऊ शकते पर्यावरण पर्यटन क्षेत्र

Galorgi.j
Galorgi.j

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील गळोरगी येथे तलाव असून, त्या तलावाच्या भागात आणि त्याच्या जवळपासच्या भागात देश-विदेशातील शेकडो प्रकारच्या विविध आकर्षक पक्ष्यांची मांदियाळी भरली असून, यामुळे या तलाव परिसरातील सौंदर्य आणखी खुलले आहे. या ठिकाणी दररोज पक्षीप्रेमी नागरिकांची वर्दळ वाढत असून स्थानिक निसर्गप्रेमी नागरिक आणि स्वामी भक्तांची तसेच येत्या काळात भेट देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. हा परिसर एक निसर्गरम्य पर्यटन तसेच पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो. 

या ठिकाणी शासन स्तरावर प्रयत्न होऊन विविध सोयीसुविधा निर्माण केल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि स्वामींच्या दर्शना व्यतिरिक्त आणखी काही पर्यटन मेजवानीही मिळू शकेल. यासाठी निसर्गप्रेमी नागरिक आणि परिसरातील तीन- चार गावच्या नागरिकांनी सतत पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. 

गळोरगी (ता. अक्कलकोटा) हे डोंगरांच्या कपारीत वसलेले उत्तम नैसर्गिक अधिवास असलेले ठिकाण आहे. गळोरगी हे अक्कलकोट शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील गाव असून त्या ठिकाणी असणाऱ्या 2.08 दशलक्ष घनमीटर पाणी साठण्याची क्षमता आहे. हा तलाव यावर्षी ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून वाहिला आहे. येथे मोठा पाणीसाठा आणि झाडेझुडपांची संख्या खूप आहे. त्यामुळे पक्ष्यांना अधिवास करण्यासाठी सुरक्षित व नैसर्गिक ठिकाण आहे. तलावाच्या चारही भागाला डोंगराळ भाग आणि मध्यभागी असणारा तलाव नैसर्गिक व प्राकृतिक सौंदर्याने नटलेला परिसर आहे. 

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दररोज हजारो भाविक सतत दर्शनास येत असतात. कोरोना काळानंतर ज्या वेळी पुन्हा अक्कलकोट तालुक्‍यातील पर्यटन थोड्या प्रमाणात का होईना पण बहरत आहे. या वेळी गळोरगी तलाव परिसरात स्वर्गीय नर्तक नर व मादी, साप पक्षी, चातक, किंगफिशर, हळदीकुंकू बदक, राजहंस, पट्टकदंब, ग्रीन बी इटर, चित्रबलाक, जांभळी पाणकोंबडी व हुडहुड यासह शेकडो आकर्षक रंगीबेरंगी पक्षी, खंड्या, अनेक प्रकारची फुलपाखरे या ठिकाणी आहेत; जेणेकरून याला आवश्‍यक खाद्य मासे व शेवाळ उपलब्ध असून, त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त आहे. येथे साधारण दीडशे प्रकारचे विविध रंगीबेरंगी आकर्षक पक्षी पाहावयास मिळत आहेत. 

ठळक... 

  • गळोरगी येथे होऊ शकते भिगवणच्या धर्तीवर सुंदर पर्यावरण पर्यटन पक्षी निरीक्षण क्षेत्र 
  • भविष्यात या ठिकाणी होऊ शकते फुलपाखरू निरीक्षण केंद्र 
  • येत्या काळात येथे तयार होऊ शकतात युवक पक्षी मित्र 
  • या ठिकाणी बोटिंग, हॉटेल सुविधा तसेच कृषी पर्यटन आधारित रोजगार निर्मिती केंद्र होऊ शकते 
  • गळोरगी येथे सुविधा दिल्यास या ठिकाणी होऊ शकते मनमोहक निसर्ग निरीक्षण केंद्र 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com