प्रेम प्रकरणातून बेपत्ता झालेल्या तरुणींच्या तपासाबाबत चिंता

सोलापुरातील अपहृत महिलांचे काय? शोधासाठी विशेष यंत्रणेची गरज
बेपत्ता महिला
बेपत्ता महिलाSakal

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला खूप मोठा वारसा आहे. या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान पुरातन कालापासून होत आहे. अलीकडील काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर दोन पाऊल पुढे टाकत आपले यशोशिखर गाठत आहे. परंतु, एकीकडे असे जरी असले तरी गेल्या काही वर्षांत सोलापूर जिल्ह्यातून तरुणी व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या अन् त्यांचा तपास न लागण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ‘सामना’ चित्रपटात ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्‍न कायम विचारला जात होता. बेपत्ता महिलांविषयी तसाच प्रश्‍न आता इथं उपस्थित होऊ लागला आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषांतून मुला-मुलींना पळवून नेण्याच्या प्रकारात गेल्या सहा वर्षांत कमालीची वाढ झाली आहे. यातील काही मुली स्वतःहून पळून गेलेल्या असल्याने त्यांचा थांगपत्ता लागण्याची शक्यता धूसर होऊ लागली आहे. काही प्रकरणात तर ऑनर किलिंगचाही संशय आहे. या तपासासाठी पोलिसांची खास अशी वेगळी यंत्रणा असावी. दैनंदिन कामकाजातून अशा तपासासाठी वेळ देण्यासाठी पोलिसांची कसोटी लागत आहे. त्यातही अल्पवयीन मुला-मुलींची प्रकरणे असतील तर पोलिस कारवाई होऊ शकते. परंतु सज्ञान मुलांबाबत पोलिसांचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. नेमके याचवेळेत तरुणाईच्या डोळ्यावर प्रेमाचा गडद पडदा आल्याने पालकांकडे जाण्यास अनेकांनी नकार दिल्याची उदाहरणे समोर आली आहेत. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणींना समजून येते, परंतु वेळ गेलेली असल्याने त्याचा काही फायदा होत नाही. ‘सैराट’ चित्रपटात रंगविल्या गेलेल्या कथानकातून सकारात्मक बोध घेण्यापेक्षा त्याचे अंधानुकरण करण्याकडे तरुणाईचे वेड दिसून आल्याची अनेक उदाहरणे आहेत.

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊ लागली आहे. अल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेण्याच्या प्रकारात झालेली वाढही चिंताजनक आहे. सज्ञान महिला, मुली व तरुण बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यातील मुंबईत दरवर्षी सर्वाधिक दोन हजारांहून अधिक गुन्हे दाखल होत आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, नांदेड, कोल्हापूर, पिंपरी- चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण, अहमदनगर, गोंदिया, सोलापूर ग्रामीण व शहरातही अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे गुन्हे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. बेपत्ता झालेल्या अथवा अपहृत महिला, मुलींच्या तपासाचे काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा पाठपुरावाही योग्य पद्धतीने होत नसल्याने या केसेस प्रलंबित राहात आहेत. राज्यभरात असे प्रकार होऊ नयेत म्हणून ‘निर्भया’ पथकाची नियुक्ती केली, परंतु या पथकाचे काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे दिसत आहे. काही प्रकरणांत घरी परतलेल्यांची तरुणींची नोंद होत नसल्याचे चित्र आहे.

चार हजारांवर केसेस तपासावर

माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, आई-वडील विवाहाला परवानगी देणार नाहीत, आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, अशाप्रकारची वेगवेगळी आमिषे दाखवून जानेवारी २०१५ ते मे २०२१ या कालावधीत राज्यभरात तब्बल ४८ हजार ७४९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात अल्पवयीन मुला व मुलींचा समावेश आहे. यामध्ये ३४ हजार ३०१ मुलींचा तर जवळपास १५ हजार ५९३ मुलांचा समावेश असून चार हजार २९२ जणांचा अजूनही तपास लागलेला नसल्याची महिती हाती आली आहे.

ठळक...

- पोलिस दलातील रिक्त पदे भरण्याची गरज

- बदलीच्या ठिकाणी अधिकारी रुजू न झाल्याने जागा रिक्त

- अल्पवयीन मुला-मुलींच्या शोधासाठी सजग पथकाची गरज

- बेपत्ता महिलांच्या शोधासाठी पाठपुरावा हवा

- पालकांच्या जागरूकतेचीही गरज

- पालक-पाल्यांमध्ये सुसंवादाची आवश्‍यकता

(सोलापूर शहराची स्थिती)

१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२१

बेपत्ता नोंदी- 432

मिळून आले - 167

अद्यापही बेपत्ता - 265

(सोलापूर ग्रामीणची स्थिती)

ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२

बेपत्ता नोंदी - 110

मिळून आले - 54

अद्यापही बेपत्ता - 56

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com