esakal | जिल्ह्यातील 82.50 टक्‍के रुग्ण बरे ! आज वाढले 2044 रुग्ण; 33 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्ह्यातील 82.50 टक्‍के रुग्ण बरे ! आज वाढले 2044 रुग्ण; 33 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील 90 हजार 865 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील दोन हजार 581 रुग्णांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण जिल्ह्याचा मृत्यूदर 2.84 टक्‍के इतका आहे. दिलासादायक बाब म्हणजे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.50 टक्‍के असून आतापर्यंत शहर- जिल्ह्यातील 74 हजार 519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आज नव्याने दोन हजार 44 रुग्णांची भर पडली असून 33 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ग्रामीणमध्ये रविवार (ता. 25) हा अक्‍कलकोट तालुक्‍यासाठी काळा दिवस ठरला. या तालुक्‍यात दहा नवे रुग्ण वाढले असून पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बार्शीत 154 रुग्ण वाढले अन्‌ पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्‍यात 165 रुग्ण वाढले असून चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माढ्यात 262 रुग्णांची वाढ झाली तर तिघांचा मृत्यू झाला. माळशिरस तालुक्‍यात 268 नव्या रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 44 रुग्ण वाढले असून दोघांचा कोरोनाने बळी घेतला.

हेही वाचा: प्रणितींना पालकमंत्री करण्याची मागणी ! भरणे म्हणाले ...तर मंत्री व आमदारकीचा राजीनामा देईन

मोहोळ तालुक्‍यात 120, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 58, पंढरपूर तालुक्‍यात 333, सांगोल्यात 70 रुग्णांची भर पडली आहे. बार्शी, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या प्रत्येकी 11 हजारांवर पोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे तुळशी (माढा) येथील 38 वर्षीय पुरुषाचा तर जेऊर (करमाळा) येथील 31 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनाने बळी घेतला. ब्यागेहळ्ळी (अक्‍कलकोट) येथील 45 वर्षीय महिलेचा तर सौंदरे (बार्शी) येथील 43 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 66 हजार 737 झाली असून त्यातील एक हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी शहरात 442 रुग्णांची वाढ झाली असून मृतांमध्ये 13 जणांची भर पडली आहे. सैफूल परिसरातील 49 वर्षीय पुरुषाचा तर गजानन नगरातील 41 वर्षीय आणि सन्मती नगरातील 48 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण रुग्णांवरच विषाणूने घाला घातला असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून वेळेत उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनाची सद्य:स्थिती

  • ग्रामीणमधील रुग्ण : 90,865

  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 74,519

  • एकूण मृत्यू : 2581

  • उपचार घेणारे रुग्ण : 13,765