esakal | कळमणमध्ये दहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह ! पालकांमध्ये अस्वस्थता; वैद्यकीय अधिकारी आज देणार भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Covid_2019

कळमण (तालुका उत्तर सोलापूर) येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये दहा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. याला तालुका गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी दुजोरा दिला आहे. 

कळमणमध्ये दहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह ! पालकांमध्ये अस्वस्थता; वैद्यकीय अधिकारी आज देणार भेट

sakal_logo
By
संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : कळमण (तालुका उत्तर सोलापूर) येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये दहा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. याला तालुका गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी दुजोरा दिला आहे. आज (बुधवारी) या शाळेमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी स्वतः जाऊन भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. 

ग्रामीण भागामध्येही कोरोनाचे प्रस्थ वाढत आहे. शासनाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अध्यापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार दहावी व बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत. मात्र शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे की नाही, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर पडला आहे. 

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना जर कोरोनाची बाधा होत असेल तर हे अतिशय विदारक असल्याचेही स्पष्ट होते. त्यामुळे दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही सरकारने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. या महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत. त्यांना सध्या शाळेत बोलावून फारसे काही साध्य होणार नाही. या विद्यार्थ्यांना घरी बसूनच अभ्यास करायला लावणे योग्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यास प्रशासनासमोर डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. 

कळमणच्या महात्मा गांधी विद्यालयात सात विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे कळाले आहे. शाळेमध्ये आज मी व गटशिक्षणाधिकारी जाऊन भेट देणार आहोत. भेटीनंतरच योग्य तो तपशील मिळेल. 
- डॉ. कुलकर्णी, 
तालुका वैद्यकीय अधिकारी, उत्तर सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल