esakal | लोकवाद्यांच्या तालात ओबीसी मेळावा रंगला, मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाला!
sakal

बोलून बातमी शोधा

लोकवाद्यांच्या तालात ओबीसी मेळावा रंगला, मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाला

गंगामाई लॉन्स येथे हजारोंच्या ओबीसी भटके विमुक्तांच्या उपस्थितीत ओबीसी- व्हीजेएनटीचा निर्धार मेळावा मंगळवारी (ता. 31) पार पडला.

वाद्यांच्या तालात ओबीसी मेळावा रंगला, मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाला

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : 'गोंधळाला ये गं आंबाबाई गोंधळाला ये...'च्या गजरात गोंधळ गीत, धनगरी ओवी मंडळाचे ढोल, वाघ्या- मुरळीची गाणी अशा लोककलावंतांच्या (Folk artist) वाद्यांच्या गजरात ओबीसींचा (OBC) आवाज घुमला. गंगामाई लॉन्स येथे हजारोंच्या ओबीसी भटके विमुक्तांच्या उपस्थितीत ओबीसी- व्हीजेएनटीचा (VJNT) निर्धार मेळावा मंगळवारी (ता. 31) पार पडला. "भटक्‍यांच्या सन्मानार्थ ओबीसी मैदानात' हे घोषवाक्‍य घेऊन ओबीसी, व्हीजेएनटी समन्वय समितीच्या वतीने भटक्‍या विमुक्तांच्या मुक्तिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोककलावंतांसह अनेक ओबीसी, भटके विमुक्त बांधव उपस्थित होते. मात्र, या मेळाव्यात कोरोनाच्या (Covid-19) नियमांचा मात्र पुरता फज्जा उडाला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या या मेळाव्यात "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे' म्हणत आरक्षण (Reservation) परत मिळवण्याचा निर्धार करण्यात आला.

हेही वाचा: नेत्यांपुढे वडेट्टीवारांनी जोडले हात! म्हणाले, ओबीसीतील हिस्सा मागू नका

कोरोना नियमांचा फज्जा

कोरोनामुळे कमीत कमी लोकांच्या उपस्थितीची अट घालून कार्यक्रमांना परवानगी देण्यात येते. मात्र प्रत्यक्ष मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री, आमदार व महापौर यांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचा फज्जा उडाला. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती तर होतीच; मात्र मंचावरदेखील मोठ्या संख्येने गर्दी होती. प्रत्येक समाज संघटनांच्या वतीने सत्कारापाठोपाठ सत्कार यामुळे मान्यवरांभोवती कार्यकर्त्यांची गर्दी हटत नव्हती. आयोजकांनी अनेक वेळा विनंती करूनदेखील मंचावरील गर्दी कमी होताना दिसत नव्हती.

हेही वाचा: मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

पुष्पहारांचे ढीग आणि "ओबीसीनायक विठ्ठल'

मंत्री वडेट्टीवार यांना "ओबीसी नायक' ही पदवी या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. या वेळी सोलापूर जिल्ह्याची ओळख तसेच बहुजन समाजाचे दैवत श्री विठ्ठलाची अडीच फूट उंचीची मूर्ती व वसंतराव नाईक यांची प्रतिमा प्रदान करण्यात आली. ओबीसीनायक पदवीबरोबरच शेकडो किलोचा पुष्पहार घालून मंत्री वडेट्टीवार यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांचे हार, घोंगडी, पारंपरिक फेटे व सोबतीला तुताऱ्या व सुंद्रीचा सूर यामुळे वातावरण दणाणून गेले होते. या वेळी वडेट्टीवार यांना मानपत्रही प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन संजय जोगीपेठकर यांनी केले.

पार्किंगसाठी तोडली झाडे

गंगामाई लॉन्सचे पार्किंग वाहनांनी भरून गेले होते. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मेळाव्याला येण्यासाठी बस व चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या वाहनांना पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने टाकळीकर मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने लावण्यात आली होती. या वाहनांचे पार्किंग तयार करण्यासाठी गंगामाई लॉन्ससमोरील झाडेही तोडण्यात आली होती.

लोककलेने जिंकली मने

जागरण गोंधळ, वाघ्यामुरळी, धनगरी ढोलांचा गजर, सनई- सुंद्रीवादकांचे सूर यामुळे वातावरणाला उत्साहाचे स्वरूप आले होते. भृतहरी कला मंच आढेगाव (ता. मोहोळ) यांचे जागरण गोंधळ, जय मल्हार शाहिरी कलापथक, पंढरपूर, श्री जकराया प्रसन्न धनगरी ओवी मंडळ, तेलगाव (ता. उ.सोलापूर) धुळदेव ओवी मंडळ ढेकवाडी (ता.मंगळवेढा) यांच्यासह सनईवादक, सुंद्रीवादक, हलगी पथके या मेळाव्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाला लमाण समाजातील पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

loading image
go to top