शिक्षकांना पुन्हा कोरोनाची ड्यूटी ! शहरातील शिक्षकांना करावे लागणार को-मॉर्बिडचे सर्व्हेक्षण

24WhatsApp_20Image_202020_04_30_20at_202.36.48_20PM_0_4.jpeg
24WhatsApp_20Image_202020_04_30_20at_202.36.48_20PM_0_4.jpeg

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असून संपूर्ण राज्य पुन्हा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांच्या संपर्कातील किमान 20 ते 30 संशयितांचा शोध घेऊन त्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तर शहरातील शिक्षकांना को-मॉर्बिड रुग्णांचा पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करावे लागणार असून लसीकरणाबद्दल जनजागृती करताना लस घेतली की नाही, याची माहिती गोळा करावी लागणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत काम करावेच लागणार 
सोलापूरसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेण्याच्या कामासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्‍ती केली असून त्यासंबंधीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहेत. त्यामुळे जबाबदारी टाळणाऱ्यांवर अथवा कामात दिरंगाई करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. 
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर 

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या कामासाठी ग्रामस्तर पथक, पर्यवेक्षीय पथक आणि तालुका पातळीवर तालुकास्तरीय समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. त्यामध्ये त्या गावातील ग्रामविकास अधिकारी, तीन सहशिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट अथवा अन्य अशासकीय सदस्य, पर्यवेक्षीय समितीत विस्ताराधिकारी (पंचायत समिती, शिक्षण अथवा कृषी विभाग), अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि विविध कार्यकारी सोसायटीचा सचिव आणि तालुकास्तरीय समितीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने प्रभावीपणे काम केल्यास कोरोनाची साखळी खंडीत होण्यास मदत होईल, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्‍त केला आहे. कोरोना संशयितांची टेस्टिंग वाढविणे, संशयितांना अलगीकरण तथा विलगीकरण कक्षात ठेवणे, गृहभेटी देणे, जनजागृती करणे आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध दुकानांकडील रुग्णांच्या भेटी तथा नोंदी ठेवणे, या कामांची जबाबदारी या समित्यांवर देण्यात आली आहे. नियुक्‍त पथकाने अथवा पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्याने कामात हयगय (दिरंगाई) केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग अधिनियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. शाळा बंद असल्याने कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी शिक्षकांची मदत घेतली जात असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत त्यांना हे काम करावे लागणार आहे. 


आदेशातील ठळक बाबी... 

  • कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी असणार समन्वय अधिकारी
  • गाव पातळीवर ग्रामस्तर पथक आणि 77 पर्यवेक्षकिय पथकांची केली जाणार नियुक्‍ती
  • तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आरोग्यसेविका, शिक्षकांचा असणार ग्रामस्तरीय समितीत समावेश
  • रुग्ण आढळल्यापासून 24 ते 48 तासांत संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेऊन रिपोर्ट देणे बंधनकारक
  • महापालिका क्षेत्रात को-मॉर्बिड रूग्णांचा सर्व्हे आणि लसीकरणाच्या माहितीसाठी शिक्षकांना ड्यूटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com