सोलापुरात कोरोनामुळे बळी गेलेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात 52 व्यक्ती

Coronas first victim in Solapur
Coronas first victim in Solapur

सोलापूर :  सोलापूर शहरातील पाच्छा पेठ परिसरातील किराणा दुकानचालकाचा  कोरोनामुळे मृत्यू झाला. निमोनिया झाल्याने या व्यक्तीला शुक्रवारी (ता. 10) सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी (ता. 11) पहाटे 1 वाजता उपचारा दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय डॉक्‍टरांना आल्याने त्यांनी या व्यक्तीचे आगोदरच नमुने घेतले होते. दरम्यान या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आणि बळी गेला. 

त्या मयत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलिस आयुक्तालय व महापालिकेच्या वतीने तत्काळ पाच्छा पेठचा एक किलोमिटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला. महापालिकेच्यावतीने या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनामुळे बळी गेलेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात 52 व्यक्ती आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली असून या 52 जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आणखी कोण-कोण? आले आहे. याचा शोध प्रशासन घेत आहे. या 52 व्यक्तींना डॉक्‍टरांच्या सल्ल्यानूसार आयसोलेशन वॉर्डात आणि इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले असून सोमवारी या चाचणीचा अहवाल येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 474 व्यक्ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये असून इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये 217 व्यक्ती आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 260 व्यक्तींची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 251 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित 8 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी केली जात आहे. या प्रयोगशाळेत सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाच्या चाचणीला विलंब लागत आहे. 

पाच्छा पेठेच्या 40 पथकाद्वारे आजपासून तपासणी 
पाच्छा पेठ परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी 40 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहा पथकांसाठी एक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांचा समावेश आहे. या परिसरातील कोणत्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास आहे का? याची तपासणी या पथकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या तपासणीला आजपासून सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

कोरोना आला कसा? प्रशासन शोधतयं उत्तर 
सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित व्यक्ती नसताना आज दुपारी कोरोनामुळे पहिला बळी सोलापुरात गेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणि पहिला बळी या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या आहेत. सोलापुरात कोरोनाची बाधा झालीच कशी? असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कोरोनामुळे मयत झालेला व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरातच रहात होता. तो बाहेरगावी कोठेही गेला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापुरात कोरोनाची लागण झाली कशी? याची माहिती काढण्यासाठी पथक नियुक्त केल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 

पाच हजार घरे सील 
पाच्छा पेठचा एक किलो मिटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. या परिसरात साधारणत: पाच हजार घरे असून जवळपास 25 ते 30 हजार नागरिक या भागात रहात आहेत. या परिसरातील व्यक्ती बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्ती या भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन, पोलिस आयुक्तालय कार्यालयाचे कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहेत. आवश्‍यकता भासल्यास या ठिकाणी जिल्हा परिषदेचेही कर्मचारी नियुक्त केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

प्रतिबंधित परिसरासाठी हेल्पलाईन 
कोरोनामुळे पाच्छा पेठ परिसरातील किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला आहे. मयत झालेला व्यक्ती किराणा दुकानदार असल्याने त्याच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच्छा पेठचा एक किलो मिटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. या परिसरात साधारणत: पाच हजार घरे असून जवळपास 25 ते 30 हजार नागरिक या भागात रहात आहेत. या नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा व जीवनावश्‍यक वस्तू मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 2740335 ही हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना आवश्‍यक असलेल्या जीवनावश्‍यक वस्तूंची व अत्यावश्‍यक सेवेची मागणी या हेल्पलाईनवर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. 

प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरज 
कोरोना मुक्त सोलापूर जिल्हा ठेवण्यासाठी आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. आपण पुन्हा कोरोना मुक्त होण्यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची आवश्‍यकता आहे. घराच्या बाहेर पडू नका. कायमस्वरूपी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्स पाळा. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com