esakal | कोरोनाची लस टोचायला जाताय? लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर अशी घ्या काळजी

बोलून बातमी शोधा

0vaccination_24 (2).jpg

आतापर्यंत सुमारे 22 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 52 हजार 400 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संकट हद्दपार होण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग वाढवा म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रूग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाची लस टोचायला जाताय? लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर अशी घ्या काळजी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना होण्यापूर्वी को-व्हॅक्‍सिन व को-विशिल्ड या दोन प्रकारची प्रतिबंधात्मक लस टोचली जात आहे. आरोग्य विभागानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. आता राज्यातील तीन कोटी को-मॉर्बिड रुग्णांना लस टोचली जात असून त्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील पाच लाख 20 हजार 40 जणांचा समावेश आहे. लस टोचण्यापूर्वी व लसीकरणानंतर या नागरिकांनी कोरोना होणार नाही, हा भ्रम काढून काळजी घ्यायला हवी, नियमांचे पालन करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

लसीकरणानंतर नियम पाळल्यास कोरोना होणार नाही
16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली असून आता तिसरा टप्पा सुरु आहे. 45 ते 59 वयोगटातील को-मॉर्बिड रुग्णांना ही लस टोचली जात आहे. लसीकरणापूर्वी आणि लस घेतल्यानंतर संबंधितांनी काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे. जेणेकरून कोणताही त्रास होणार नाही आणि कोरोनाचा धोका टळेल.
- डॉ. बिरूदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

राज्यातील कोरोनाचा जोर पुन्हा वाढू लागला असून मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मोठी आहे. आतापर्यंत सुमारे 22 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 52 हजार 400 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संकट हद्दपार होण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग वाढवा म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रूग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एक हजारांपर्यंत खासगी रूग्णालये असून ज्या तालुक्‍यात या योजनेतील रुग्णालये नाहीत, त्याठिकाणच्या लोकांसाठी जिल्हा तथा उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय केली आहे.

लसीकरणापूर्वी अन्‌ लसीकरणानंतर अशी घ्या काळजी...

 • 45 ते 59 वयोगटातील को-मॉर्बिड व्यक्‍तींनी लस टोचायला जाताना शक्‍यतो आजाराचे प्रमाणपत्र घेऊन जावे
 • लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर या काळात किमान दोन महिने मद्यपान करू नये
 • लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणार नाही, याची सर्वांनी घ्यावी काळजी
 • उपाशीपोटी लसीकरणासाठी जाऊ नको, लसीकरणावेळी त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा
 • लसीकरणाला जाण्यापूर्वी आठवडाभर अतिरिक्‍त मद्यपान करू नये अथवा शक्‍यतो मद्यपान टाळावेच
 • लस टोचल्यानंतर तीन दिवस मद्यपान करू नये, अथवा दुसरा डोस घेईपर्यंत मद्यपान करूच नये
 • लसीकरणापूर्वी ताप, अंगदुखीच्या गोळ्या लसीकरणापूर्वी घेऊ नये; कोविशिल्ड, को-व्हॅक्‍सिन अतिशय उत्तम लस
 • लस घेतल्यानंतर काहींना गरगर होते, त्यामुळे अर्धा तास तिथेच बसा; अलॅर्जी, वेदना होऊ नये म्हणून लसीकरणानंतर थोडे थांबा
 • दंडावर अथवा खांद्याच्या कॉर्नरवर लस घेतल्यानंतर ती जागा सुजते, त्यामुळे वेदनाशामक गोळी, तापाच्या साध्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात
 • शरीरात किमान दोन-तीन लिटर पाणी ठेवावे; लसीकरणानंतर दूरचा प्रवास, ओझे उचलण्यासारखे काम करु नये
 • लस घेतल्यानंतर प्रतिकारक शक्‍ती तयार होण्यासाठी किमान 14 दिवस लागतात; एकच डोस घेऊन चालणार नाही
 • दुसऱ्या डोस घेतल्यानंतर 15 दिवसांत शरीरात रोगप्रतिकारक शक्‍ती निर्माण होईल आणि कोरोनाची लागण होणार नाही
 • 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागेल; दोन्ही डोस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करावेच लागेल