मोहोळ तालुक्यात सर्दी, तापाचे रुग्ण वाढले; वातावरणाचा परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cough Cold Fever Patient

वातावरणातील बदलामुळे मोहोळ शहरातील ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील दवाखान्यात थंडी, ताप, सर्दी, यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Cough Cole Fever Patient : मोहोळ तालुक्यात सर्दी, तापाचे रुग्ण वाढले; वातावरणाचा परिणाम

मोहोळ - वातावरणातील बदलामुळे मोहोळ शहरातील ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील दवाखान्यात थंडी, ताप, सर्दी, यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान कोरोना सदृस्य आजाराचा अद्याप एकही रुग्ण आढळला नसून, दररोज वरील आजाराच्या रुग्णांची संख्या वाढती असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पी पी गायकवाड यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसा पासून मोहोळ तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन यामुळे नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, आदी आजार होऊ लागले आहेत. आजार वातावरणातील बदलामुळे होत असल्याचे शासकीय सह खाजगी डॉक्टरांनी सांगितले. या वातावरणाचा खरबूज, कलिंगड, टोमॅटो यासह अन्य पिकावर ही परिणाम झाला असून फवारण्या वाढल्या आहेत. "व्हायरल इन्फेक्शन" मुळे घशात खवखवणे, अंगदुखी, धाप लागणे, अशी लक्षणे दिसू लागतात. अशी लक्षणे दिसताच नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला डॉ गायकवाड यांनी दिला आहे. दररोज येणाऱ्या अशा रुग्णावर औषधोपचार करून त्यांना खबरदारीचा सल्ला देण्यात येतो.

दरम्यान वारंवार हात स्वच्छ धुणे, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, पौष्टिक आहार घेणे, हस्तांदोलन टाळणे, पाणी भरपूर पिणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टी केल्या तर या आजारांना बऱ्यापैकी आळा बसत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.